ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच ठाण्यातील कोव्हॅक्सिन लसीचा साठा जवळपास संपल्याने दररोज सुमारे १० हजार नागरिकांचे होणारे लसीकरण निम्म्यावर आले. मंगळवारी ५५०० लोकांचे लसीकरण झाले. लसीकरणाकरिता सुरू केलेल्या केंद्रांमध्ये कपात करण्याची नामुष्की साथ वाढत असतानाच आली आहे. अगोदर ५१ केंद्रांवर सुरू असलेले लसीकरण मंगळवारी ३४ केंद्रांवरच सुरू होते. तब्बल १७ केंद्रे बंद ठेवण्यात आली. लसीचा साठा येण्यास जेवढा विलंब होईल तेवढी लसीकरणाची प्रक्रिया धीमी होणार असून, त्याचवेळी रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.
आत्मनिर्भर भारत योजनेचा भाग असलेल्या स्वदेशी कोव्हॅक्सिनचा साठा संपला असल्याने लसीकरण बंद करण्याची वेळ पालिकेवर आली आहे. कोविशिल्ड ६३ हजार लस शिल्लक असून ज्यांनी पहिला डोस त्या लसीचा घेतला आहे त्यांना दुसऱ्या डोससाठी त्या वापरायच्या आहेत. कोविशिल्डचा साठादेखील आठ दिवस पुरेल एवढाच असल्याने पहिला डोस घेतलेल्यांना कोणती लस द्यायची, असा प्रश्न उपस्थित होणार आहे.
ठाणे महापालिका हद्दीत रोजच्या रोज ८ ते १० हजार नागरिकांचे लसीकरण सुरू होते; परंतु आता लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने शहरातील १७ केंद्रे बंद करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. सोमवारी लस उपलब्ध करून देण्याच्या मुद्यावरून स्थायी समितीत गदारोळ झाला होता. मंगळवारी लसीचा आवश्यक साठा उपलब्ध होईल, असे आश्वासन आरोग्य विभागाने दिले होते; परंतु मंगळवारीदेखील कोव्हॅक्सिन लसीचा साठा उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे सोमवारी शिल्लक असलेला दोन हजार कोव्हॅक्सिन लसीचा साठा मंगळवारी संपुष्टात आल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. लसीकरणावरून केंद्र व राज्य सरकार एकमेकांकडे बोट दाखवीत आहे; परंतु लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याचा मोठा फटका नागरिकांना बसला आहे.
दरम्यान, कोव्हॅक्सिनचा साठा संपल्याने आता लसीकरण बंद करावे लागणार की काय, अशी शंका निर्माण झाली होती; परंतु तूर्त कोविशिल्डचा शिल्लक ६३ हजार लसींचा साठा वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बुधवारपासून ठाण्यात पुन्हा कोविशिल्ड लस दिली जाणार आहे; परंतु ज्यांना कोविशिल्डची पहिली लस दिली होती त्यांच्यासाठी तो साठा शिल्लक ठेवला होता; परंतु आता तोच साठा वापरून लसीकरण सुरू असल्याचे भासवले जाणार आहे. कोविशिल्डचा साठा यापुढे उपलब्ध होणार नाही, अशी माहिती अधिकारी खासगीत देत असताना ज्यांनी पहिला डोस कोविशिल्डचा घेतला त्यांना लसीचा दुसरा डोस कसा उपलब्ध होईल, याबाबत ठाणेकरांच्या मनात शंका आहे.
............
कोवॅक्सीनचा साठा संपला आहे; परंतु आता शिल्लक असलेल्या कोविशिल्डचा ६३ हजार लसींचा साठा पहिल्या आणि दुसऱ्या डोससाठी वापरला जाणार आहे; परंतु तो पुढील ८ ते १० दिवसांकरिताच उपलब्ध असणार आहे.
- डॉ. राजू मुरूडकर, मुख्य वैद्यकीय आरोग्य, अधिकारी -ठामपा
.........