उल्हासनगर : शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणांवर पालिकेने धडक कारवाई सुरू केल्याने रस्ते मोकळे श्वास घेतील असे आयुक्त अच्युत हांगे यांनी सांगितले. मंगळवारी शहाड फाटक ते सी ब्लॉक व पालिका मुख्यालया समोरील रस्त्यावरील अतिक्रमणे जमीनदोस्त केली.मागील आठवडयात शांतीनगर ते डॉल्फिन रस्त्यावरील अनेक अतिक्रमणांवर कारवाई केली. त्यापाठोपाठ मंगळवारी शहाड रेल्वे स्टेशन ते सी ब्लॉक रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई केली. सहायक आयुक्त गणेश शिंपी, अजित गोवारी, भगवान कुमावत यांच्या पथकाने ही कारवाई केली. तसेच पालिका मुख्यालया समोरील रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई सायंकाळी सुरू केल्याची माहिती शिंपी यांनी दिली.अतिक्रमणांमुळे नागरिकांना चालणे कठीण झाल्याने हे चित्र बदलण्यासाठी आयुक्त हांगे यांनी कारवाई सुरू केली. राजकीय पक्ष व नगरसेवकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र आयुक्तांच्या आक्रमक भूमिकेमुळे कारवाई सुरू आहे. या कारवाईमुळे वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात सुटणार असल्याची प्रतिक्रीया रिक्षा चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. तर अतिक्रमण हटविल्याने रस्ते मोकळा श्वास घेणार असल्याचे मत हांगे यांनी व्यक्त केले. दुभाजकांना पांढरे पट्टे मारण्याचे काम सुरू केले आहे. मुख्य मार्केटमधील अतिक्रमण दूर करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनजंय बोडारे यांनी केली आहे.
अतिक्रमणांवर चालवला हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 11:47 PM