ठाणे : ठाणेकरांवर एकीकडे कोरोनाचे संकट घोंघावत असताना दुसरीकडे धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. ऐन पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडून धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींंना नोटिसा बजावण्यात येत आहेत. सध्या ७९ पैकी ३५ अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांनी इमारती रिक्त केल्या असून ४४ इमारतींवर येत्या काही दिवसांमध्ये कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये मुंब्रा, कळवा आणि वागळे इस्टेट या प्रभाग समित्यांच्या क्षेत्रामध्ये ऐन पावसाळ्याच्या दरम्यान धोकादायक इमारती कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर अतिधोकादायक तसेच धोकादायक इमारतींमधील कुटुंबीयांचे अन्यत्र स्थलांतर करून त्या रिकाम्या करण्यास पालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. येत्या काही दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संकटात ऐन पावसाळ्यात शेकडो ठाणेकरांवर अगदी हक्काचे घर सोडण्याचीही नामुश्की येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ज्या दुरुस्त करून पुन्हा वास्तव्य करता येणे शक्य आहे, अशा इमारतींना दुरुस्त करून त्याबाबतचा अहवाल महापालिकेकडे देण्याच्याही नोटिसा काही इमारतींना बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोपरी-नौपाड्याला सर्वाधिक धोकाठाणे महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये ठाण्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कोपरी-नौपाड्यात सर्वाधिक ३७ अतिधोकादायक इमारती आहेत. त्यानंतर, मुंब्रा भागात १४ इमारतींचा समावेश असून वर्तकनगरमध्ये नऊ इमारती आहेत. त्याचबरोबर उथळसर ७, लोकमान्यनगर-सावरकरनगर प्रभाग समितीमधील कामगार रुग्णालय वसाहतीच्या पाच इमारती, कळवा- तीन, दिवा आणि वागळे इस्टेटमध्ये प्रत्येकी एका अतिधोकादायक इमारतीचा समावेश आहे.तब्बल चार हजार इमारती दुरुस्तीच्या प्रतीक्षेतठाण्यातील चार हजार ११३ इमारतींना सध्या दुरुस्तीची गरज आहे. यामध्ये सी-२ बी या इमारती रिकाम्या न करता दुरु स्ती करण्यायोग्य असलेल्या दोन हजार २८३ इमारती आहेत. तर, सी-३ या किरकोळ दुरु स्ती करण्यायोग्य असलेल्या एक हजार ८३० इमारतींचा समावेश आहे. या सर्व इमारती दुरु स्त करून वास्तव्य करण्याच्या नोटिसा संबंधित गृहसंकुलांना पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली.- 4300 इमारती धोकादायक महापालिकेने घोषित केलेल्या धोकादायक इमारतींपैकी सी-१ हा अतिधोकादायक इमारतींचा प्रकार असून अशा इमारती नोटीस बजावल्यानंतर काही कालावधीनंतर जमीनदोस्त केल्या जातात. तर, सी-१-ए मधील म्हणजे धोकादायक इमारती रिकाम्या करून त्यांचे संरचनात्मक परीक्षण केले जाते.यंदा सर्वेक्षणामध्ये ठामपाच्या क्षेत्रातील 09 प्रभाग समित्यांमधील सुमारे 4300 धोकादायक इमारतींची यादी आहे. त्यामध्ये अतिधोकादायक 79 इमारतींचा समावेश आहे. त्यापैकी 35 इमारती रिक्त केल्या असून आता केवळ 44 इमारती या प्रकारामध्ये शिल्लक आहेत. त्याही रिक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.घरे खाली करण्यास रहिवाशांचा नकार सी-२-ए मध्ये ११३ इमारतींचा समावेश आहे. यातही सुमारे १५० पेक्षा अधिक कुटुंबे ही धोकादायक इमारतींमध्ये जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत.या इमारतींमधील रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा महापालिकेने बजावल्या आहेत. मात्र, कोरोना आणि पावसाळ्याच्या दुहेरी संकटामुळे अनेक इमारतींमधील रहिवाशांनी त्या रिक्त करण्यास नकार दिला आहे.अशा वेळी ज्या इमारती कधीही कोसळण्याच्या म्हणजे अतिधोकादायक स्थितीमध्ये आहेत, त्या शक्य होईल तितक्या लवकर रिकाम्या करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
- ठाणे शहरात ७९ अतिधोकादायक इमारती होत्या. त्यापैकी ३५ इमारती या रहिवाशांनी रिकाम्या केल्या आहेत. उर्वरित इमारतीदेखील रिकाम्या करण्यासाठीची प्रक्रिया युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. - अशोक बुरपुल्ले, उपायुक्त, ठाणे महानगरपालिका