लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर: अनेक वर्षांपासून रखडलेली बदलापूर पूर्वेतील अतिक्र मण हटवण्याची कारवाई अखेर बुधवारी पार पडली. या वेळी पालिका अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, कारवाई करण्यापूर्वी पालिकेकडून कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचा आरोप अनेक दुकानदारांनी केला. या कारवाईने अनेक वर्षांनंतर रस्त्याशेजारी चालण्यास फुटपाथ मिळतील, असे नागरिकांचे म्हणणे आहे.बदलापूर शहरातील वाढत्या लोकसंख्येचा रस्त्यांवर पडलेला ताण काही वर्षांपासून जाणवत होता. मात्र, पश्चिमेतील रस्ता रुंदीकरणाआड येणाऱ्या व्यापाऱ्यांच्या न्यायालयीन लढाईचा अडसर दूर होताच पालिकेने मोठ्या पोलीस फौजफाट्यासह धडक कारवाई केली. पूर्वेतही कात्रप रस्त्यालगत अनेक दुकानदारांनी फुटपाथ काबीज करत आपले व्यवसाय त्यावर सुरू केले होते. गेली अनेक वर्षे येथे कारवाई न झाल्याने दुकानदार आणि बेकायदा बांधकाम करणाऱ्यांचे बळ वाढले होते. अखेर, आज कुळगाव-बदलापूर नगरपालिकेने पूर्वेतील स्थानक परिसर, कात्रप रस्त्यावरील दुकानांचे बेकायदा अतिक्र मण भुईसपाट केले. या वेळी स्थानक परिसरातील १० ते १२ वर्षे जुनी दुकाने, हॉटेल्स यांचे फुटपाथवरील अतिक्र मण हटवले. मात्र, ही कारवाई सुरू असताना अनेक छोट्या दुकानदारांनी कारवाईत दुजाभाव होत असल्याचा आरोप केला. मोठे हॉटेल्स, राजकीय नेत्यांचे वाइन शॉप आणि दुकानांवर फक्त कारवाईचा देखावा करण्यात आला. मात्र, छोट्या दुकानांना जमीनदोस्त करण्यात आले. तसेच कारवाईच्या पूर्वी नोटीस दिल्या नसल्याचा आरोपही अनेक दुकानदारांनी या वेळी केला. त्यामुळे ऐनवेळी बुलडोझर आल्याने अनेकांनी पळापळ झाली.ही कारवाई होत असताना अनेक राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांचे फोन कारवाईस्थळी उपस्थित अभियंत्यांना येत होते. मात्र, अभियंत्यांनी त्यांना प्रतिसाद न दिल्याने कारवाईवेळी शहरातील अनेक नगरसेवक कारवाईच्या आसपास फिरताना दिसत होते. या वेळी शिवसेनेच्या एका बड्या नेत्याच्या दुकानावरही हातोडा चालवण्यात आला. ही कारवाई उद्याही सुरू राहणार आहे.
बदलापूर पूर्वेतील अतिक्र मणांवर हातोडा
By admin | Published: June 01, 2017 4:50 AM