ठाणे : राबोडी-२ भागातील शिवाजीनगरमधील ओम सूर्या ही तळ अधिक तीन मजली इमारत खचल्याची घटना सोमवारी रात्री घडली होती. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून येथील ५७ कुटुंबांना इमारतीबाहेर काढले होते. त्यानंतर, तिची तज्ज्ञांमार्फत पाहणी केली होती. आता ती अतिधोकादायक स्थितीत आल्याचा अहवाल आल्याने तीवर कारवाई करण्यात येणार आहे.
या इमारतीचे बांधकाम १९९३ पूर्वी करण्यात आले आहे. तीत ५७ कुटुंबे राहत होती. सोमवारी रात्री इमारतीच्या खांबाला तडा गेला आणि इमारतीचा काही भाग खचला होता. ही बाब इमारतीमधील रहिवाशांना कळताच त्यांनी इमारतीबाहेर धाव घेतली. त्यानंतर, ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. या दोन्ही विभागांनी सुरक्षेचा उपाय म्हणून शाळेत या सर्व कुटुंबीयांना तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित केले आहे.
राहण्यास अयोग्यमंगळवारी इमारतीच्या बांधकामाची पाहणी करण्याचे काम सुरू होते. त्यानंतर, आता या तज्ज्ञांनी ती राहण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे इमारत तोडावी अथवा पालिकेकडून तोडण्यास परवानगी द्यावी, असे सुचवले जाणार आहे.