उल्हासनगर : धोकादायक इमारतींचे उल्हासनगर पालिकेने चार टप्प्यांत वर्गीकरण केले असून त्यानुसार अतिधोकादायक ठरलेल्या इमारतींपैकी तीन इमारती तोडण्यास सुरुवातही झाली आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातील आणखी १४ इमारती महिनाभरात तोडल्या जाणार असल्याने रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.पहिल्या टप्प्यात अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त करण्यात येणार असून साई आसाराम, शिवशक्ती या इमारती पाडण्यास सुरुवात झाल्याची माहिती उपायुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. उल्हासनगर पालिकेने सर्वेक्षण करून ३४८ धोकादायक, तर ३० इमारती अतिधोकादायक घोषित केल्या. पण, सर्वेक्षणात तफावत आढळल्याने आयुक्त मनोहर हिरे व उपायुक्त नितीन कापडणीस यांनी पुन्हा प्रभागनिहाय सर्वेक्षणाचे आदेश दिले. गेल्या चार वर्षांत अनेक अतिधोकादायक इमारतींवर कारवाई झाली. मात्र, त्या इमारतींची नावे यादीतून वगळली नव्हती. काही धोकादायक इमारतींची पुनर्बांधणी झाल्याचेही फेरसर्वेक्षणात दिसून आले. त्यानंतर, नव्या यादीनुसार १२६ धोकादायक, तर १४ इमारती अतिधोकादायक असल्याची माहिती त्यांनी दिली. या यादीवर नजर टाकली असता, पालिकेने नव्याने १२६ इमारती धोकादायक म्हणून घोषित केल्या आहेत. नव्या सर्वेक्षणात या इमारतींची संख्या वाढण्याची शक्यता आयुक्तांनी व्यक्त केली आहे.त्यासाठीच पालिकेने सतर्कतेचा इशारा देत तज्ज्ञ समिती व प्रभाग समितीनिहाय अभियंत्यांमार्फत सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सुरुवातीला पालिकेने प्रभाग-१ मध्ये ६६, प्रभाग-२ मध्ये १४५, प्रभाग-३ मध्ये ७५, तर प्रभाग-४ मध्ये ६२ इमारती धोकादायक असल्याचे जाहीर केले होते. प्रांत कार्यालयामागील साई आसाराम, पालिका परिसरातील शिवशक्ती या अतिधोकादायक इमारती पाडण्याचे काम सुरू असून २५ सेक्शन भागातील दोन मजली इमारत शुक्रवारी जमीनदोस्त केल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. (प्रतिनिधी)
अतिधोकादायक इमारतींवर हातोडा
By admin | Updated: June 4, 2016 01:34 IST