डोंबिवली : पश्चिमेकडील गरिबाचा वाडा, अनमोल नगरीच्या प्रवेशद्वाराजवळ एका शाळेच्या आरक्षित भूखंडावर सात मजली अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. त्याची तक्रार होऊनही कारवाई न झाल्याबद्दल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्याचा जाब राज्य सरकारच्या अवर सचिवांनी विचारताच मंगळवारी ह प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांनी या बांधकामावर कारवाई केली. परंतु प्रभागक्षेत्र अधिकारी भारत पवार यांनी केलेली कारवाई अर्धवट असून ती इमारत पूर्ण जमीनदोस्त करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते कौस्तुभ गोखले यांनी केली आहे.
ते म्हणाले, जर महापालिका कारवाई करते तर ती पूर्ण का नाही करत? अर्धवट किंवा तोंडदेखली कारवाई करून त्यातून काही साध्य होत नाही. राज्य सरकारला केवळ कारवाई करण्यात आली असा अहवाल पाठवला जातो आणि पुन्हा इमारत जैसे थे उभी राहते. त्यामुळे पवार यांनी केलेली कारवाई थातूरमातूर असून तारांकित प्रश्न उपस्थित केलेली कारवाई पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
विधानसभेत तारांकित प्रश्न यावा एवढी वेळ महापालिकेवर यावी ही या शहराची शोकांतिका आहे हे योग्य नसल्याचे ते म्हणाले. जर विधानसभेत फडणवीस हे प्रश्न उपस्थित करू शकतात तर येथील नगरसेवक, महापालिका प्रशासन हवे कशाला? थेट तिकडून समस्या सुटणार असतील तर तसे स्पष्ट सांगावे, म्हणजे थेट सरकार दरबारी तक्रारी करण्यात येतील.
याखेरीज आणखी २८ तक्रारी असून त्या नजीकच्या काळात फडणवीस यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या महापालिका क्षेत्रात निदर्शनाला आलेल्या सुमारे २८ आरक्षित भूखंडांवर काम सुरू असून आणखी अनधिकृतपणे बांधकामे राजरोस सुरू आहेत. ग, फ, ह तसेच आय आणि कल्याण, टिटवाळा, शहाड, नांदीवलीसह सबंध कल्याण ग्रामीण या सर्व परिसरात काय सुरू आहे याचा विचार महापालिका करणार आहे का? की शहरांच्या डीपी प्लॅनचा पुरता बोजवारा उडाल्यावर प्रशासन जागे होणार, असा सवाल त्यांनी विचारला. ग प्रभाग क्षेत्रात राजरोसपणे काम सुरू असल्याचे ते म्हणाले.
-----------------------------------------
शाळेच्या आरक्षित भूखंडावर बांधकाम झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर त्याबाबत विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित झाला होता. त्यानुसार त्या बांधकामावर मंगळवारी सकाळपासून पोलीस संरक्षणात कारवाई करण्यात आली.
- भारत पवार, ‘ह’ प्रभाग अधिकारी
----------------
फोटो आहे.