लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : ठाकुर्लीतील पोलीस चौकीसमोरील वाळकू जोशी बिल्डिंग या चार मजली अतिधोकादायक इमारतीवर केडीएमसीने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हातोडा चालविला. केडीएमसीने २२ जुलैपासून सात दिवसांत मनुष्यबळ व पोकलेन मशीनने ही इमारत जमीनदोस्त केली.
वाळकू जोशी बिल्डिंग १९८० मध्ये बांधण्यात आली होती. या इमारतीत एकूण ३८ घरे व ५ गाळे होते. या इमारतीला सात वर्षांपासून महापालिका अतिधोकादायक इमारत म्हणून नोटीस बजावत होती. या इमारतीस उच्च न्यायालयाने २०१६ पासून मनाई हुकूम दिला होता. अखेर उच्च न्यायालयाने ८ जुलैला ही इमारत सात दिवसांत रिकामी करून पुढील १५ दिवसांत तोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार इमारत रिकामी करून भाडेकरूंचे सर्वेक्षण करून त्यांना तसेच व मालकांना भोगवटा प्रमाणपत्र दिले असल्याची माहिती केडीएमसीने जनसंपर्क विभागाने शुक्रवारी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
महापालिकेच्या ‘फ’ प्रभागातील अतिक्रमण निर्मूलन विभागाचे १० कर्मचारी, अन्य कामगार, उपअभियंता शैलेश मळेकर, अनिल इंगळे, रामनगर पोलीस ठाणे, वाहतूक शाखा व महापालिकेचे पोलीस कर्मचारी यांनी चार ब्रेकर, एक पोकलेन, एक जेसीबीद्वारे ही कारवाई केली. प्रभाग क्षेत्र अधिकारी भारत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
--------