सदानंद नाईक, उल्हासनगर : महापालिकेने पहिल्या टप्प्यात अतीधोकादायक असलेल्या ५ इमारती निष्काशीत करण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी गुलमोहर पार्क इमारतीवर पाडकाम कारवाई सुरू केली असून ५० धोकादायक इमारती दुरुस्तीसाठी खाली करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांनी दिली आहे.
उल्हासनगरात धोकादायक इमारतीचा प्रश्न नेहमी ऐरणीवर राहिला असून इमारतीचे स्लॅब पडून अनेकांचा बळी गेला आहे. महापालिकेने पावसाळ्यापूर्वी ८ अतीधोकादायक इमारतीसह २९४ धोकादायक इमारतीची यादी प्रसिद्ध केली. त्यापैकी ८ धोकादायक इमारती निष्काशीत करण्याचा निर्णय घेतला असून पहिल्या टप्प्यात गुलमोहर पार्क, साई उपहार अपार्टमेंट, कोमल पार्क, लविना अपार्टमेंट व माय होम अपार्टमेंट यांच्यावर पाडकाम कारवाई करण्याचा निर्णय घेतला. तसेच ५० धोकादायक इमारती खाली करून दुरुस्ती सुचविली आहे. पावसाळ्या पूर्वी या इमारती खाली करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. तसेच सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या नेतृत्वाखाली धोकादायक इमारतीवर पाडकाम कारवाई सुरू केली आहे.