उल्हासनगर : महापालिकेने कल्याण-डोंबिवली दुर्घटनेचा धसका घेऊन स्वामी शांतिप्रकाश व महालक्ष्मी या अतिधोकादायक इमारतींवर तोड कारवाई सुरू केली आहे. टप्प्याटप्प्याने अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त करणार असल्याची माहिती आयुक्त मनोहर हिरे यांनी दिली. गेल्या महिन्यात झुलेलाल टॉवर्स व पंचशील अपार्टमेंट या अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त केल्या आहेत.उल्हासनगरात ३९१ धोकादायक तर २७ अतिधोकादायक इमारती असून पालिकेने दोन वर्षांत ९ धोकादायक इमारती जमीनदोस्त केल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षेचा दृष्टिकोन पुढे ठेवून अतिधोकादायक इमारती टप्प्याटप्प्याने जमीनदोस्त करण्याचा निर्णय आयुक्त मनोहर हिरे यांनी घेतला आहे. कॅम्प नं.-१ गोलमैदानमधील महालक्ष्मी व कॅम्प नं.-५ परिसरातील स्वामी शांतिप्रकाश या इमारतीची पाहणी आयुक्तांसह उपायुक्त नितीन कापडणीस, सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी करून इमारतीवर पाडकाम कारवाई सुरू केली आहे. महापालिकेने दोन्ही इमारतींवर पाडकाम कारवाई करण्यापूर्वी शेजारील इमारती, दुकाने खाली केली. कॅम्प नं-.५ वसंत दरबार परिसरातील स्वामी शांतिप्रकाश इमारतीत १०८ दुकाने असून महालक्ष्मी इमारत यापूर्वीच खाली केली आहे. शहरातील ३९१ धोकादायक इमारतींना नोटिसा देऊन प्लॉट खाली करण्याचे आवाहनही आयुक्तांनी प्लॉटधारकांना केले आहे. वसंत बहार परिसरात सर्वाधिक अवैध बांधकामे झाली असून त्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.महालक्ष्मी व स्वामी शांतिप्रकाश इमारती पाडण्याला ३ ते ४ दिवस लागणार असल्याने परिसरात पोलीस तैनात करून वाहतूककोंडी होऊ नये म्हणून वाहतूक मार्ग बदलण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे. इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी प्रभाग समिती अथवा पालिका मुख्यालयात विनंती केल्यास इमारतीचे सर्वेक्षण करून जमीनदोस्त करणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
उल्हासनगरात ‘त्या’ इमारतींवर हातोडा
By admin | Published: August 04, 2015 3:18 AM