लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे शहरातील अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना घराबाहेर काढून उद्यापासून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांना मंगळवारी दिले. या अतिधोकादायक व धोकादायक इमारतींविषयी अद्ययावत माहिती नगरसेवक, नागरिक यांना देण्याची सूचनाही त्यांनी केली.पावसाळ्याच्या तोंडावर आयुक्तांनी अतिधोकादायक व धोकादायक इमारतींच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि सर्व खातेप्रमुखांची बैठक नागरी संशोधन केंद्रात आयोजित केली होती. अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण या बैठकीला उपस्थित होते. ठाणे शहरामध्ये अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींची मिळून एकूण संख्या ३६९३ आहे. यातील अतिधोकादायक (सी-१) या संवर्गात एकूण ६९ इमारती येतात. या इमारतींपैकी ज्यामध्ये कुणीही राहत नाही त्या सर्व इमारती उद्यापासून पाडून टाकण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. उर्वरित इमारतींमध्ये जर कुणी राहत असेल तर त्या मोकळ््या करुन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. धोकादायक (सी-२ए) या गटातील इमारतींची संख्या ९१ असून या इमारती त्वरीत मोकळ््या करण्याची कारवाई सुरू करण्याचे आदेश जयस्वाल यांनी दिले. याखेरीज इमारत रिकामी न करता दुरुस्ती शक्य असलेल्या( सी २ बी) तसेच किरकोळ दुरुस्तीची गरज असलेल्या( सी ३) या गटात मोडणाऱ्या इमारतींची नियमित पाहणी करून त्याबाबतचा अहवाल मुख्यालयास सादर करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
अतिधोकादायक ६९ इमारतींवर आजपासून हातोडा
By admin | Published: May 24, 2017 1:15 AM