ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शहरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर सलग तिसऱ्या दिवशीही कारवाई सुरूच होती. मंगळवारी सहा अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.
महापालिका क्षेत्रातील उभी राहिलेली व रहिवास सुरू न झालेली अनधिकृत बांधकामे प्रामुख्याने पाडण्यात येत असून निवासी वापर सुरू झालेल्या अनधिकृत बांधकामांबाबत प्रक्रिया पार पाडून बांधकामे निष्कासीत करण्याचे आदेश आयुक्त शर्मा यांनी सर्व सहायक आयुक्तांना यापूर्वीच दिले आहेत.
त्यानुसार शहरातील प्रत्येक प्रभागातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमधील बाळकूम येथील तीन आरसीसी बांधकामे व एक ढाबा जमीनदोस्त करण्यात आला. कळवा प्रभाग समितीमधील एक आणि नौपाडा प्रभाग समितीमधील एक आरसीसी बांधकाम निष्कासित करण्यात आले.
अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उपायुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त डॉ. अनुराधा बाबर, सचिन बोरसे व शंकर पाटोळे यांनी अतिक्रमण नियंत्रण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने कारवाई केली.
..............