डोंबिवली : पूर्वेतील रेल्वेस्थानकाजवळील केळकर रोडवरील वृंदावन ही अतिधोकादायक इमारत गुरुवारी केडीएमसीतर्फे तोडण्यात येणार आहे. तळमजला अधिक तीन मजली असलेल्या या इमारतीचा परिसर मोठा असल्याने हे तोडकाम चार दिवस चालणार आहे. या कालावधीत केळकर मार्गावरील वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. अन्य ठिकाणांहून वाहतूक वळविण्यात येणार असून, डोंबिवली वाहतूक विभागाने याबाबतची अधिसूचना जाहीर केली आहे.
वृंदावन इमारतीचे बांधकाम १९७१ मधील आहे. इमारत आधीच अतिधोकादायक जाहीर केल्याने तेथे कोणीही रहिवासी राहत नाहीत. तळमजल्यावरील दुकाने ही गेल्या दोन दिवसांपासून रिकामी करण्यात आली आहेत. गुरुवारी सकाळपासून तोडकाम सुरू केले जाणार आहे. चार दिवस हे काम चालणार असल्याने गुरुवारी सकाळी ७ ते रविवार रात्री ८ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी सुरक्षिततेच्या कारणास्तव रस्ता बंद ठेवला जाणार आहे, अशी माहिती डोंबिवली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते यांनी दिली.
असे आहेत वाहतुकीतील बदल
केळकर रोडवरील वृंदावन बिल्डिंगसमोरील रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. मानपाडा रोड, गणेश कोल्ड्रिंक्समार्गे रामकृष्ण हॉटेल मार्गे रेल्वे स्थानकाला अथवा त्या ठिकाणच्या परिसरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना हस्तकला दुकानासमोर तसेच बोडस मंगल कार्यालयाजवळ प्रवेशबंदी केली आहे. पर्यायी मार्ग म्हणून रामकृष्ण हॉटेल रोडवरून उजवे वळण घेऊन सुभाष डेअरीमार्गे केळकर रोडच्या दिशेने जातील, अथवा बालभवन चौक येथून चिपळूणकर रोड मार्गे एस. के. पाटील चौकातून सरळ राजाजी पथ गल्ली क्रमांक १ मार्गे इच्छितस्थळी जातील.
------------
डीएनसी, नांदिवली, गिरनार चौक येथून वामन दिनकर जोशी मार्गे शिवमंदिर रोडवरून रेल्वेस्थानक अथवा त्या परिसरात येणाऱ्या वाहनांना वामन जोशी चौक स्पार्टनर्स जिम येथे तसेच एस. के. पाटीलमार्गे बिर्याणी कॉर्नर येथे प्रवेशबंदी केली आहे. पर्यायी मार्ग म्हणून वामन जोशी चौक आणि एस. के. पाटील चौक येथे डाव्या बाजूस वळण घेऊन राजाजी पथ गल्ली क्रमांक १ मार्गे पुढे जातील.
-------------
स्थानक परिसरातून रामनगर रिक्षा स्टॅण्डसमोरील एस. व्ही. रोडमार्गे जाणाऱ्या सर्व वाहनांना डोंबिवली वाहतूक शाखेसमोर वाहतूकबंदी करण्यात आली आहे. ही वाहने राजाजी पथ गल्ली क्रमांक १ मधून एस. के. पाटील चौकातून इच्छितस्थळी जातील.
---------------------------------