ठाणे :- ‘संकल्प प्रतिष्ठान आयोजित “संकल्प दहीहंडी उत्सव २०२४” याचे यंदा १९ वे वर्ष असून जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास रोख २५ लाखांचे पारितोषिक या उत्सवात दिले जाणार असून पहिले ९ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ५ लाख तर इतर गोविंदा पथकास देखील संबंधित रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या भगिनींसाठी विशेष हंडी सन्मान हंडी बांधण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजक व प्रतिष्ठानचे अध्यक्ष रविंद्र फाटक यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
गोविंदांसह गोपिकाही या उत्सवात सहभागी होतात. अनेक पथके अशी आहेत, ज्यात केवळ मुलीच आहेत. या मुली मुलांप्रमाणेच धाडस दाखवत थरांवर थर लावून हंडी फोडतात. त्यामुळे मुंबई, ठाणे येथील महिलांच्या गोविंदा पथकाला विशेष मान देण्यात येणार असून त्यांच्यासाठीही विशेष पारितोषिक संकल्प प्रतिष्ठानतर्फे ठेवले गेले आहे. या भव्यदिव्य दहीहंडी कार्यक्रमात एकूण ३ हंडीचा थरार आपल्याला अनुभवायला मिळणार आहे.
एक हंडी ठाण्यातील पथकांसाठी तर दुसरी दहीहंडी ही मुंबईतील पथकांसाठी असेल, तर संकल्पच्या दहीहंडी उत्सवाला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिंदी व मराठी सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेते कलाकारांची रेलचेल पहावयास मिळेल. तसेच अमीर हडकर यांच्या माध्यमातून मनोरंजनाचे विविध भव्य दिव्य अविष्कार सादर करून गोविंदांचे मनोरंजन करण्यात येईल, तसेच गोविंदांना प्रोत्साहन देण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांसहित अनेक मंत्री व राजकीय मान्यवर उपस्थित राहतील.
गोविंदांच्या सुरक्षेची विशेष काळजी आयोजकांकडून घेण्यात आली असून त्यांना सेफ्टी किट, रोप, हेल्मेट यांसहित सुरक्षितेकरीता व वैद्यकीय उपचाराकरिता उपयुक्त अशा उपाययोजना दिल्या जाणार असून गोविंदांसाठी भोजनाची विशेष सोय देखील करण्यात येणार आहे. गोपाळकाल्याच्या पूर्वसंध्येला मराठीतील सुप्रसिद्ध हास्य जत्रेची टीममधील कलाकार विशेष सेलिब्रिटी हंडी फोडून श्री कृष्णजन्म साजरा करणार आहेत.