ठाणे : शासकीय कामाच्या खर्चासाठी दिलेल्या निधीतील सुमारे ९ हजारांचा अपहार केल्याप्रकरणी ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे निलंबित अधीक्षक हिरालाल जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. एकाच पोलीस ठाण्यात जाधव यांच्याविरोधात वर्षभरात वेगवेगळे चार गुन्हे दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे तत्कालीन कार्यालयीन अधीक्षक व सध्या आर्थर रोड कारागृहात कार्यरत असलेले ज्योतीराम पवार (५१) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जाधव यांच्याविरोधात अपहार केल्याचा गुन्हा ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत, जाधव यांनी पेटी कॅशमधील पैसे खाजगी गाडीत डिझेल भरण्यासाठी वेळोवेळी घेतल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारे त्यांनी सुमारे ९ हजारांचा अपहार केला असून हा प्रकार एप्रिल ते आॅगस्ट २०१६ दरम्यान घडला आहे. हे पैसे दबाव टाकून घेतल्याचे तक्रारीत नमूद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.जाधव यांच्यावर याआधी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्या गुन्ह्यासह कारागृहात गाड्या घुसवणे, अॅट्रॉसिटी आणि आता अपहार असा चौथा गुन्हा दाखल झाला आहे. विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
निलंबित कारागृह अधीक्षकाविरोधात अपहाराचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 2:09 AM