लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणो: कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर ऑनलाईन व्यवहारांना अधिक महत्त्व प्राप्त झाले. अगदी दुधाच्या बिलापासून ते बँकेच्या घर हप्त्यापर्यंतची रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर होऊ लागली. त्याचबरोबर ऑनलाईन व्यवहारांमध्ये निरक्षर असणाऱ्यांची मात्र ठगबाजांकडून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. गेल्या दीड वर्षात ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ऑनलाईन फसवणुकीचे ६५५ गुन्हे दाखल झाले असून, यामध्ये ८० लाखांहून अधिक फसवणूक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळातील ३५ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात २०१९ मध्ये सायबर सेलमध्ये २९९ तक्रारी दाखल झाल्या, तर २०२० मध्ये २८६ तर २०२१ मध्ये ६७ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये ८० लाखांपेक्षा अधिक फसवणूक झाली असून, त्यातील ३५ लाख ६८ हजार ११३ रुपये इतकी रक्कम तक्रारदारांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या सायबर सेलने मिळवून दिली आहे.
२०२० मधील सायबर क्राईम फसवणूक - महिलांचा छळ - २०२० मध्ये ऑनलाईन फसवणुकीच्या २८६ घटना समोर आल्या असून, यात एटीएम कार्डचा पासवर्ड न देताही हजारो रुपये लंपास करण्यात आले आहे. एखाद्या महिलेची एफबीद्वारे किंवा इन्स्टाग्रामवर ओळख झाली की, तिचे एकांतवासातील फोटो अपलोड करण्याची धमकी देत लैंगिक तसेच आर्थिक फसवणुकीच्या घटना समोर आल्या आहेत.
सायबर क्राईम वाढतोय
२०१९ - २९९
२०२० - २८९
२०२१ - ६७ (जूनपर्यंत)