नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी: देशाच्या पंचात्तराव्या अमृत मोहत्सवी स्वातंत्र दिनानिमित्त शासनाने हर घर तिरंगा मोहीम देशभर राबवण्याचे ठरविले आहे. या मोहिमेअंतर्गत यावर्षी मोठ्या प्रमाणात तिरंगा झेंड्यांची खरेदी विक्री होणार आहे.झेंडा खरेदी विक्रीसाठी शासनाने विविध उपाययोजना केला असल्या तरी सध्या १५ ऑगस्टजवळ आल्याने तिरंगा झेंडा बनविणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हात कामात व्यस्त झाले आहेत.विशेष म्हणजे या वर्षी हर घर तिरंगा मोहीम पहिल्यांदा राबविली जात असल्याने या कामगारांवर कामाचा अतिरिक्त ताण देखील वाढला आहे.
भिवंडीतील दापोडा येथील साई धाम कॉम्पलेक्समध्ये दि फ्लॅग शॉप या कंपनीचा झेंडे बनविण्याचा कारखाना आहे.या कारखान्यात सध्या झेंडे बनविणारे कर्मचारी कामात व्यस्त आहेत.स्वातंत्र्य दिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून हर घर तिरंगा मोहिमेमुळे या कंपनीतील कामगार सध्या तिरंगा झेंडा बनविण्यात प्रचंड व्यस्त आहेत. त्यातच काही कामगार बाहेरगावी तर काही कामगार कंपनीच्या दुसऱ्या शाखेत गेल्याने भिवंडीतील कारखान्यात सचिन गमरे व सिराज उलहक हे दोन कामगार झेंडा बनविण्याच्या कामात व्यस्त दिसले.या कंपनीत २ बाय ३ इंच तसेच ४ बाय ६ इंच पासून ते ४८ बाय ७१ फूट तसेच ६० बाय ९० फुटांपर्यंतचे लहान मोठे सर्वच झेंडे बनविले जात असून २ बाय ३ फूट ते ४ बाय ६ फुटाच्या मोजमापाचे सुमारे २०० ते ३०० झेंडे या कारखान्यात दिवसाला बनविले जातात. तर मोठे झेंडे एका दिवसात आठ पर्यंत बनविण्यात येत असल्याची माहिती येथील कामगारांनी दिली आहे.
कारखान्यात कामगारांना आठ तासांचे काम आहे मात्र सध्या झेंड्यांची मागणी वाढल्यामुळे येथील कामगारांना सकाळी १० ते रात्री १० असे बारा तास काम करावे लागत असून त्यासाठी कंपनीकडून २० ते २५ हजार रुपयांचे मासिक वेतन येथील कामगारांना दिले जाते.विशेष म्हणजे देशाच्या तिरंगी झेंड्याबरोबरच या कारखान्यात जगातील २५२ हुन अधिक देशांचे झेंडे बनविण्यात येत असून राजकीय पुढारी झेंड्यांची अर्धवट रक्कम देत नसल्याने राजकीय झेंडे येथे बनविले जात नसल्यची माहिती कामगारांनी दिली आहे.