प्रशांत माने, कल्याण कल्याण डोंबिवली महापालिकेची सन २००५ ची निवडणूक युती विरूध्द आघाडी अशी झाली. निवडणुकीत दोघांनाही स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यात तब्बल १८ अपक्ष निवडून आल्याने सत्तेची सूत्रे त्यांच्या हाती गेली. या अपक्षांच्या मदतीने आघाडीने युतीची सत्ता उथलून टाकीत केडीएमसीवर आपला झेंडा रोवला. दरम्यान अडीच वर्षानंतर अपक्षांना आपल्याकडे वळवून पुन्हा एकदा पालिकेची सत्ता काबीज करण्यात शिवसेनेला यश आले.सन २००५ च्या निवडणुकीत नव्याने प्रभाग रचना करण्यात आली. प्रभागांची संख्या ८६ वरून १०७ वर पोहोचली. तत्पूर्वी सन २००२ मध्ये राज्य शासनाकडून कल्याण डोंबिवली महापालिकेतील २७ गावे वगळण्यात आली होती. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप या दोघांनी युतीने लढण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाल्याने ही निवडणुक युती विरूध्द आघाडी अशी झाली.निवडणुकीच्या लागलेल्या निकालात शिवसेनेला २९ तर भाजपाला १६ जागा मिळाल्या आणि आघाडीतील राष्ट्रवादीने २३ तर काँग्रेसने २१ जागांवर विजय मिळविला होता. युतीकडे ४५ तर आघाडीकडे ४४ असे बलाबल होते. यात १८ अपक्ष निवडून आले होते. स्पष्ट बहुमत नसल्याने सत्तेची सूत्रे अपक्षांच्या हाती गेली. अपक्षांच्या मदतीने युतीच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावत आघाडीने केडीएमसीवर प्रथमच आपला झेंडा रोवला. सत्ता परिवर्तनात राष्ट्रवादीचे पुंडलिक म्हात्रे महापौर तर काँग्रेसचे पंडीत भोईर हे उपमहापौर झाले. शिवसेना विरोधी पक्षात बसली. दरम्यान सत्ता आघाडीची असलीतरी स्थायी समितीचे सभापतीपद पटकाविण्यात शिवसेनेला यश आले. त्यात अडीच वर्षानंतर अपक्षांना आपल्याकडे वळवून घेत सेनेने पुन्हा सत्ता मिळविल्याने आघाडीला केवळ अडीच वर्षेच सत्ता उपभोगता आली.
सूत्रे अपक्षांच्या हाती; आघाडी सत्तेत
By admin | Published: October 12, 2015 4:36 AM