लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : आंबा म्हटले की, सगळ्य़ांच्याच तोंडाला पानी सुटते. आंबा हा फळांचा राजा असला तरी यालाही लॉकडाऊनचा फटका बसला आहे. बाजारात विविध प्रकारचे आंबे असून, त्यांच्या विक्रीवर लॉकडाऊनचा परिमाण झाला आहे. लॉकडाऊनमध्ये होलसेल व्यापाऱ्यांना दोन तासांची मर्यादा आखून दिली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून आंब्याची मागणी कमी केली जात आहे. एकीकडे होलसेल बाजारात आंब्याला दीडपट कमी भाव मिळत असला तरी किरकोळ बाजारात हा भाव दीडपटीने जास्त आहे.
बाजारात रत्नागिरीचा हापूस कमी असून कर्नाटकी हापूस जास्त आहे. हापूसच्या जोडीला केशर, पायरी, गावरान आंब्याचीही विक्री केली जात आहे. दशेरी हा आंबा उत्तर भारतातून येतो. त्यालाही मागणी आहे. सध्या बाजारात केशर आणि दशेरी आंब्याची चलती आहे. त्याच्या जोडीला तोतापुरी, अलीबाग, बदाम या आंब्याची विक्री होत आहे. सामान्यांना हापूस परवडत नसल्याने त्यांच्याकडून तोतापुरी, बदाम आणि अलिबाग आंब्याला पसंती दिली जात आहे. मागच्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन लागला. त्यावेळी व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला. कारण त्यावेळी शिथिलता नव्हती. फळबाजार सुरू होता. मात्र, मागचे वर्ष फारसे तेजीचे नव्हते. यंदाही फारसी तेजी नाही.
------------
आंबा व्यापारी कोट
१. कोरोनामुळे संचारबंदी आहे. बाजाराची वेळ केवळ दोन तासच आहे. दोन तासांत धंदा काय करणार? त्यामुळे आम्ही माल कमी मागवत आहोत.
- बिसमिल्ला शेख, कल्याण
२. भाव कमी आहे. बाजारात ग्राहक नाहीत. त्यामुळे यंदा आंब्याने निराशा केली आहे. माल मागवून करणार काय? तो खराब होणार. होलसेलला भाव कमी आहे.
-हमीद बाबू, कल्याण
-------------
आंबा उत्पादक शेतकरी अडचणी
१. यंदा अवकाळी पावसामुळे हापूसचे उत्पादन फारसे झाले नाही. त्यामुळे बाजारात कर्नाटकी हापूसला मागणी जास्त आहे. त्यामुळे यंदा हापूस जास्त नाही.
-आबा केसरकर, शेतकरी
२.लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांना विक्रीची वेळ कमी दिली आहे. त्यांच्याकडून मालाची मागणी केली जात नाही. त्यामुळे आम्हाला आंबा शेतात विकण्याची वेळ आली आहे. त्याला भाव जास्त नाही. शहरात भाव जास्त मिळतो.
-दिलीप भोगले, शेतकरी.
-------------
आवक असली तरी आम्हीच माल कमी मागवितो
सध्या रत्नागिरी हापूसपेक्षा कर्नाटकी हापूस बाजारात जास्त आहे. कोकणातील हापूस आंब्याऐवजी गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून आंब्याची आवक आहे. बाजारात रत्नागिरी हापूस महाग असल्याने सामान्य लोक केशर आंब्याला पसंती देत आहेत. शेतकऱ्यांचे फोन येतात. माल घेता का, म्हणून विचारतात. मात्र, माल मागवून काय करणार? कमी वेळेत धंदा काय करणार? घेतलेला माल वेळेत विकला नाही तर तो खराब होणार. त्यामुळे व्यापारीच माल कमी मागवत आहेत.
-------------
आंब्याचे दर
हापूस (रत्नागिरी)-६०० ते ७०० रुपये डझन
हापूस (कर्नाटक) - ७० रुपये प्रतिकिलो
-------------
आंब्याचे प्रतिकिलो दर (किरकोळ)
केशर-१०० रुपये
पायरी-८० रुपये
गावरान-६० रुपये
-------------
आंब्याचे प्रतिकिलो दर (घाऊक)
केशर-७० रुपये
पायरी-४० रुपये
गावरान-३० रुपये
-------------