ठाणे : फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूसला यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे ग्राहक रस्त्यावर नाहीत, स्वस्त दरात विकला जाणारा कर्नाटकी आणि केरळ आंबा, त्यात हापूसचे उत्पादन कमी आणि ग्राहकही कमी यामुळे यंदा हापूसच्या विक्रीवर जवळपास ६० टक्क्यांनी घसरण झाल्याचे निरीक्षण आंब्याचे व्यापारी आणि आंबा महोत्सवाच्या आयोजकांनी नोंदविले आहे.
उन्हाळा सुरू झाला की हापूसचे वेध लागतात. कोकणातून येणारा देवगड आणि रत्नागिरीच्या आंब्याची शहरातील खवय्ये चातकासारखी वाट पाहत असतात; परंतु यंदा मात्र शेतकऱ्यांना नुकसानच नुकसान सहन करावे लागले आहे. गेल्यावर्षी कर्नाटक आणि केरळचा आंबा न आल्याने कोकणातील हापूस थेट ग्राहकांच्या दारात पोहोचला होता. त्यामुळे लॉकडाऊन असूनही विक्री चांगली झाली होती. यंदा मात्र दुसऱ्या लाटेत रुग्ण वाढल्याने काही ग्राहक आंबा घ्यायला घाबरतात. लॉकडाऊन असल्याने ग्राहक स्टॉलपर्यंत येत नाही आणि यावेळेस कर्नाटक आणि केरळचा आंबा लवकर बाजारात आला आहे. तो स्वस्त असल्याने हापूस समजून ग्राहक कर्नाटक - केरळचे आंबे खात आहेत असे व्यापाऱ्यांनी सांगितले. तसेच, यंदा उत्पादनही कमी झाल्याने आंबा कमी प्रमाणात आला आहे. त्यामुळे विक्रीवर थेट परिणाम झाला आहे. दर कमी असूनही ग्राहक फिरकेनसे झाले असल्याचे हापूसच्या विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्यात नाराजीचे वातावरणही आहे.
यंदा लॉकडाऊनमुळे सोशल मीडियाचा वापर करून हापूसचे विक्रेते ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे दुसऱ्या लाटेत ऑनलाइन विक्रीवर अधिक भर देण्यात आला आहे.
-------------------------------
यंदा हापूसच्या विक्रीवर प्रचंड परिणाम झाला आहे. दरवर्षी १५०० हून अधिक पेटींची विक्री होते. यंदा ती हजार पेटींच्या आत आली आहे. लॉकडाऊन, त्यात आर्थिक चणचण असल्याने यंदा हापूस स्वस्त असूनही ग्राहक घेत नाहीत. गेल्यावर्षी सोसायटीमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला होता. यंदा उत्पादन कमी असल्याने हापूसचे दरही वाढविले नाहीत आणि त्यात ग्राहकही फारसे नाहीत. यंदा ग्राहक स्टॉलपर्यंत येत नसून आम्ही ग्राहकांपर्यंत पोहोचत आहोत. गेल्यावर्षी जी विक्री झाली ती यंदा झाली नाही.
- सचिन मोरे, किरकोळ आणि घाऊक आंब्याचे व्यापारी
------------------------------------
अन्य वस्तूंवरही झाला परिणाम
आंब्याबरोबर कोकम, आमरस, आंबा पोळी, फणस पोळी, कोकम सरबत, मँगो पल्प, आवळा सरबत, ठेचा पापड, आवळा मावा, सांडगी, मिरची, कैरी पन्हे हे पदार्थही विक्रीला येतात; परंतु ग्राहक स्टॉलवर येत नसल्याने या पदार्थांच्या विक्रीवरही मोठा परिणाम झाला आहे.
------------------------------------
कोकण विकास प्रतिष्ठान आणि संस्कार यांच्या वतीने गेली १४ वर्षे गावदेवी मैदान येथे आंबा महोत्सव भरविला जातो. कोरोनामुळे यंदा ऑनलाइन विक्री केली जात आहे. प्रत्यक्षात जेवढी महोत्सवात विक्री होते तितकी ऑनलाइनवर होत नाही. महोत्सवातून दीड कोटी आर्थिक उलाढाल होत असते. यंदा मात्र ५० टक्के विक्री झाली. तसेच आर्थिक गणित पूर्ण बिघडले आहे. दोन वर्षे आंबा विक्रीला फटका बसला आहे. शो मस्ट गो ऑन म्हणून ऑनलाइन आंबा विक्री सुरू ठेवली आहे.
- आ. संजय केळकर, आयोजक, आंबा महोत्सव
---------------------------
श्रीराम विविध औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून आंब्याचे स्टॉल्स लावले जातात. यंदाही आम्ही स्टॉल लावले; परंतु ग्राहक नाही. लॉकडाऊन, कर्नाटक, केरळ आंब्याचा फटका आणि उत्पादन कमी त्यात ग्राहक कमी या सर्वांमुळे शेतकऱ्यांचे दोन्ही बाजूने नुकसान झाले आहे. हापूस हातात घेतल्याशिवाय लोकांचे समाधान होत नाही; पण लॉकडाऊनमुळे स्टॉलपर्यंत ग्राहक येत नसल्याने विक्री होत नाही. यंदा कर्नाटक आणि केरळ आंब्याचे लवकर आगमन झाल्याने हा आंबा देवगड, रत्नागिरीच्या नावाने विकला जातो आणि हापूस समजून ग्राहक या आंब्याला फसतात. या सर्वांचा परिणाम हापूसवर झाला आहे. गेल्यावर्षी चांगला प्रतिसाद हापूस विक्रीला मिळाला होता. थेट हापूस सोसायटीपर्यंत पोहोचला होता. यंदा परिस्थिती उलट आहे.
- सीताराम राणे, सल्लागार, श्रीराम विविध औद्योगिक सहकारी संस्था
--------