ठाणे : फेरीवाल्यांना मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह सात जणांची ठाणे न्यायालयाने गुरुवारी जामिनावर सुटका केली आहे. या वेळी न्यायालय परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.ठाणे रेल्वे स्थानक परिसरात पादचा-यांना अडथळा करत ठाण मांडणा-या फेरीवाल्यांना हुसकावून लावत त्यांना मारहाण केल्याप्रकरणी जाधव यांच्यासह महेश कदम, रवींद्र मोरे, रवींद्र सोनार आणि संदीप साळुंखे आदी सातही जणांविरुद्ध २१ आॅक्टोबर रोजी ठाणेनगर आणि नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. २३ आॅक्टोबर रोजी या सर्वांना ठाणेनगर पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात त्यांना बुधवारी जामीन झाल्यानंतर नौपाडा पोलिसांनी त्यांचा ताबा घेतला होता. नौपाडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातही त्यांनी फेरीवाल्यांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी दिली. या कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता, प्रत्येकी १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर तसेच तपासकामात पोलिसांना सहकार्य करणे, पुन्हा शांततेचा भंग न करणे अशा अटींवर त्यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली.