ठाणे - जवळपास २0 वर्षांपासून एके ५६ सारखे घातक शस्त्र बाळगून असलेल्या आरोपींनी त्याचा वापर कधी आणि कुणाला संपवण्यासाठी केला, या महत्त्वाच्या मुद्यावरच पोलीस यंत्रणा संभ्रमात आहे. त्यासाठी न्यायवैद्यक चाचणी करण्याची तयारी पोलिसांनी चालवली असली तरी तज्ज्ञांच्या मते ही बाब केवळ आरोपींच्या कबुली जबाबातूनच स्पष्ट होऊ शकेल.ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा हस्तक नईम फईम खान याच्या गोरेगाव येथील घरातून एके ५६ रायफलसह शस्त्रांचा साठा ६ जुलै रोजी हस्तगत केला होता. याप्रकरणी नईम खानची पत्नी यास्मिन खान हिला पोलिसांनी अटक केली. नईमला दोन वर्षांपासून एका गुन्ह्यामध्ये ठाणे कारागृहात डांबले आहे. जवळपास २0 वर्षांपासून ही घातक शस्त्रे आरोपींच्या ताब्यात असल्याची पोलिसांची माहिती आहे. आरोपीकडे एके ५६ कुठून आली, ती १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटादरम्यान पाकिस्तानातून आलेल्या शस्त्रांपैकी एक आहे का, या दोन मुद्यांवर पोलिसांचा तपास सुरूच आहे. मात्र, या कालावधीत आरोपींनी त्याचा वापर केला का, या महत्त्वाच्या प्रश्नाचेही उत्तर पोलीस यंत्रणा शोधत आहे. या आणि इतर प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी शस्त्रसाठ्याची न्यायवैद्यक चाचणी (फोरेन्सिक टेस्ट) पोलिसांकडून केली जाणार आहे. परंतु,कोणत्याही अग्निशस्त्राचा वापर अलिकडेच झाला असेल तरच ते न्यायवैद्यक चाचणीतून स्पष्ट होऊ शकते. अग्निशस्त्राचा वापर करून काही महिने उलटून गेल्यास न्यायवैद्यक चाचणीतून ते स्पष्ट होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली असता, त्यांनीही या मुद्याला दुजोरा दिला. त्यामुळे शस्त्रांच्या वापराबाबत आरोपींनी कबुली दिली तरच ठोस माहिती मिळू शकेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.नईमची पत्नी यास्मिनने दिलेल्या माहितीनुसार, केवळ तीन महिन्यांपूर्वी हा शस्त्रसाठी तिच्या घरामध्ये ठेवण्यात आला होता. त्यापूर्वी हा साठा अंमली पदार्थाच्या तस्करीमध्ये पोलिसांनी अटक केलेल्या जाहीद अली शौकत काश्मिरीकडे होता. त्याने आणखी कुणाच्या ताब्यात शस्त्रे दिली होती का, अशा काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरेही पोलिसांना शोधायची आहेत.
एके ५६ चा वापर यापूर्वी झाला का? पोलीस संभ्रमात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 5:31 AM