प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : लॉकडाऊनला विरोध करत ठाण्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर मंडळींनी हॅशटॅग महाराष्ट्र वाचवा ही पोस्टर चळवळ सोशल मीडियावर सुरू केली आहे. लॉकडाऊन वाढवून कोरोना रुग्ण संख्या कमी झालेली नाही , लॉकडाऊन हे त्यावर औषधही नाही त्यामुळे लॉकडाऊन हटविण्यात यावे अशी मागणी करणारे पोस्टर्स बनवून त्यात आपणच जबाबदारीने वागून थांबलेले आयुष्य पुढे नेऊया असे सांगण्यात आले आहे. ठाण्यातील प्रसिद्ध पर्यावरण अभ्यासक/ निवेदक मकरंद जोशी, व्यावसायिक सुजय पत्की, कमर्शिअल आर्टिस्ट अतुल जोशी यांच्या संकल्पनेतून ही चळवळ उभी राहिली आहे. विशेष ठाण्यातील विविध स्तरातील लोकांतून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
2 जुलै रोजी केवळ ठाण्यातच लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे ठाणेकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर लॉकडाऊनचा कालावधी 19 जुलै पर्यंत वाढविण्यात आला आणि ठाणेकरांचा विरोध तीव्र होऊ लागला. पुन्हा लॉकडाऊन वाढवू नये, लॉकडाऊन हा उपाय नाही हे प्रशासनाला सांगत नागरिकांनी स्वतःनुच जबाबदारीने वागावे याबाबत जागृती करणारी ही चळवळ उभी राहिली आहे. लॉकडाऊन विरोधात ठाणेकर सोशल मीडियावर, किंवा आपापसांत व्यक्त होतात त्यावेळी सगळ्यांचे एकेक म्हणणे आहे की, लॉकडाऊन वाढविण्यापेक्षा लोकांनी जबाबदारीने वागावे म्हणून ही लोकचळवळ सुरू केली असल्याचे मकरंद जोशी यांनी सांगितले. शासनाने/प्रशासनाने लोकांना नियमांबाबत जाणीव करून दिली पाहिजे जे अजून करण्यात आलेले नाही. मास्क नाही घातले, सोशल डिस्टनसिंग नाही पाळले म्हणून संख्या वाढते हे नागरिकांच्या माथी मारायचे हे शासनाचे धोरणच चुकीचे आहे. त्यामुळे लोकांना आत्मविश्वास या चळवळीतुन देत आहोत असे त्यांनी सांगितले. अतुल जोशी यांनी हे पोस्टर तयार केले आहेत. यात सामान्य नागरिक, सेवा पुरविणारा, रिक्षा-टॅक्सी चालक, कामगार, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, कलाकार, कर्मचारी याना सहभागी करून या पोस्टरवर मी जबाबदारीने वागीन असा मजकूर लिहिला आहे. यात मी माझ्या कार्यक्षेत्रात पुन्हा कार्यरत होऊन आरोग्य अंतर आणि नियमित स्वच्छतेने माझ्या संपर्कातल्या सगळ्यांची काळजी घेईन. हॅशटॅग करूया जबाबदारीने पुन्हा सुरुवात असे नमूद करण्यात आले आहे.