लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे आदेश वेलरासू यांनी सोमवारी प्रभाग अधिकाऱ्यांना दिले. या कारवाईच्या वेळी पुरेसा पोलीस बंदोबस्तही पुरवला जाईल, असे आश्वासनही पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांनी दिले.केडीएमसी हद्दीतील रेल्वे, वन, एमएमआरडीए आणि महापालिकेच्या जागांवर असलेल्या बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यासाठी सोमवारी महापालिका मुख्यालयात आयुक्त पी. वेलरासू यांच्या दालनात बैठक झाली. याप्रसंगी पोलीस उपायुक्त डॉ. शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वन विभाग, रेल्वे, एमएमआरडीएचे अधिकारीही उपस्थित होते.केडीएमसी हद्दीत बेकायदा ४४ धार्मिक स्थळे आहेत. त्यापैकी १२ धार्मिक स्थळे रेल्वे प्रशासनाच्या, तीन वन विभागाच्या तर तीन एमएमआरडीएच्या हद्दीत आहेत. केडीएमसीने आपल्या हद्दीतील ११ धार्मिक स्थळांवर यापूर्वीच कारवाई केल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. उर्वरित धार्मिक स्थळे तातडीने तोडण्याचे आदेश प्रभाग क्षेत्र अधिकाºयांना वेलरासू यांनी दिले. या कारवाईसाठी आवश्यक बंदोबस्त पुरवला जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त शिंदे यांनी सांगितले.रेल्वे, एमएमआरडीए आणि वन विभागाच्या जागेवर बेकायदा उभ्या असलेल्या धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याबाबत संबंधित प्राधिकरणाला पत्राद्वारे कळवावे, असेही या बैठकीत ठरविण्यात आले.सोसायट्यांनीही परवानगी घेणे आवश्यकमहापालिका हद्दीत २९१ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळे आहेत.४४ हजार घरांमध्ये गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. या व्यतिरिक्त खाजगी मंडळेही सोसायट्यांच्या आवारात गणेशमूर्तीची स्थापना करतात, अशा मंडळांनीही परवानगी घ्यावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त शिंदे यांनी केले आहे.गणेशोत्सव मंडळांना एक खिडकीद्वारे परवानग्यागणेशोत्सवाच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने झालेल्या या बैठकीत गणेशोत्सव मंडळांना एक खिडकी योजनेद्वारे सर्व परवानग्यादेण्याचा निर्णय घेण्यात आला.यामध्ये अग्निशमन, वाहतूक विभाग, केडीएमसी, पोलीस आणि महावितरण या कार्यालयाकडून सर्व परवानग्या एकत्र करून महापालिका हद्दीतील आठ पोलीस ठाण्यांमधून या परवानग्या दिल्या जाणार आहेत.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या परवानग्यांसाठी स्थानिक पोलीस ठाण्यात अर्ज करावयाचे आहेत. १३ आॅगस्टपासून या परवानग्या देण्याचे काम सुरू होणार आहे. अर्ज दिल्यानंतर दोन दिवसांनी या परवानग्या मंडळांना दिल्या जातील....अन्यथा गुन्हे नोंदवणारउच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रस्त्याच्या एक चतुर्थांश जागेवर मंडप उभारून उर्वरित पाऊण जागा रहदारीसाठी खुली ठेवणे आवश्यक आहे. मात्र, काही मंडळे एक चतुर्थांशपेक्षा जास्त जागा व्यापतात. त्यामुळे वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होतो. यावर उपाय म्हणून दोन पोलीस ठाणे मिळून एक असे चार भरारी पथक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. भरारी पथके मंडपांची तपासणी करणार आहेत.या पथकात वाहतूक पोलीस, महापालिका अधिकारी व पोलीस प्रतिनिधी असतील. न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन केल्यास दोषी मंडळांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बेकायदा धार्मिक स्थळांवर लवकरच पडणार हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 6:21 AM