- प्रज्ञा म्हात्रे ठाणे : ओखी चक्रीवादळ, अवकाळी पाऊस, प्रचंड ऊन-थंड हवा असा तापमानातील चढउताराचा खेळ अशा वातावरणातील बिघाडाचा फटका फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्याला बसला आहे. सर्वांच्या आवडत्या आंब्याचे दर सध्या दुपटीपेक्षा अधिक असल्याने ग्राहक त्याकडे फिरकेनासे झाले आहे. त्यामुळे बाजारपेठेत आलेला रत्नागिरी, देवगडचा हापूस रुसल्याचे दिसून येते. सध्या आंब्याचे दर आकारानुसार डझनाला ७०० ते १५०० रुपयांवर असल्याची माहिती आंबे विक्रेत्यांनी ‘लोकमत’ला दिली.हापूस आंबा म्हटल्यावर सहजपणे आठवण येते ती कोकणाची. सर्वात आधी बाजारात येतो तो देवगडचा हापूस आणि त्यानंतर रत्नागिरी, अलिबाग, कर्नाटक, बंगळूरचे आंबे येण्यास सुरूवात होते. गुढीपाडव्याला फळे बाजारात येतात. अनेक जण अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त गाठून आंबा खरेदी करतात. तेथून मग आंबा खरेदीला वेग येतो.उन्हाळी सुट्टी संपताच पिवळ््या-केशरी, मधूर, रसाळ आंब्यांकडे पावले वळतात. एप्रिल ते जून हा या आंब्याचा कालावधी. त्यामुळे या तीन महिन्यांत भरपूर आंबे खाण्याचे प्लॅन केले जातात. आबालवृद्धांपर्यंत सर्वांना हवाहवासा असणारा आंबा खाण्याची मैफल सजू लागते. जेवताना आमरस, आंब्याच्या फोडी किंवा संध्याकाळच्या वेळी आंबा खाण्याची मजा औरच असते. या कोकणच्या राजावर भरभरुन प्रेम करणारे खवय्ये डझनांच्या हिशेबाने, पेट्यांच्या आकारानुसार आंबेखरेदी सुरू करतात.यंदा मार्च महिन्यात आंबे येण्यास सुरूवात झाली असली, तरी सुरूवातीच्या काळात नेहमीप्रमाणे आंब्याचे दर चढेच होते. सुरूवातच हजाराच्या घरात झाली होती. त्यामुळे एप्रिल महिना सुरू झाला, तरी आंबा भाव खात असल्याने अवीट गोडीचा आणि खवय्यांचा लाडका हापूस आंबा स्थानिक बाजारपेठांत दाखल झाला आहे, पण त्याचे दर ऐकून सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.या आंब्याचे दर गगनाला भिडले असल्याने मुलांच्या आग्रहाखातर ग्राहक घासाघीस करुन माफक खरेदी करत आहेत. अनेक खवय्ये लवकरच दर कमी होतील, अशी आशा बाळगून आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्याचे दोन आठवडे उलटत आले तरी आंब्याला समाधानकारक गिºहाईक मिळालेले नाही.पर्यावरणाचा समतोल बिघडल्याच्या परिणाम अर्थातच आंब्यांच्या उत्पादनावर झालेला आहे. छोट्या आकाराच्या आंब्याचे दर एरव्ही ३०० रुपये डझन असतात. परंतु यंदा ते दुपटीपेक्षाही अधिक म्हणजे ७०० रुपये डझन आहेत. आंब्यांची आवक घटल्याने स्वाभाविकपणे दर चढेच आहेत. त्यामुळे ग्राहकांनी आंब्याच्या खरेदीकडे पाठ फिरविल्याचे सध्याचे चित्र आहे. एप्रिल महिन्यात येणाºया आंब्यातील आता फक्त ३० टक्के आंबाच आतापर्यंत आल्याने भाव लगेचच उतरण्याची कोणतीही चिन्हे नसल्याची नाराजी आंबे विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. आंब्याचा बाजार थंडावलेला असल्यामुळे रोजची ४० ते ५० पेट्यांची होणारी विक्री ही चक्क १० पेट्यांवर आली आहे. परीक्षा संपली तरीही ग्राहक आंबा खरेदीकडे वळलेला नाही. लहान मुले हट्ट करतात म्हणून आणि चवीपुरतीच आंब्याची खरेदी केली जात आहे. सर्वसामान्य ग्राहकाने सध्या आंबा खरेदीवर काटच मारली आहे. दर कमी होण्याची सारे वाट पाहात आहेत. ग्राहकही दरामध्ये घासाघीस करीत असल्याचे निरीक्षण आंबा विक्रेत्यांनी नोंदविले आहे. रत्नागिरी, देवगडप्रमाणे थोडाफार अलिबागचा आंबा आलेला आहे. थंडीत अवकाळी पावसाच्या फटक्याने मोहोर गळून पडल्याने आंबे घटले. त्यामुळे यंदा मे महिन्यापर्यंत परिस्थिती अशीच राहणार आहे. हापूस आंब्याप्रमाणे पायरीही बाजारात आला आहे. तोही ७०० रुपये डझन प्रमाणे मिळत आहे. वातावरणाने साथ दिली तरच आंब्याची आवक वाढेल. दर कमी होतील आणि सर्वसामान्यांच्या खिशाला आंबा परवडू शकेल. अन्यथा मनसोक्तपणे आंबा खाता येणार नाही, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली. सध्या ग्राहक नसल्याने विक्रेत्यांतही मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. आंबा सध्या कमी प्रमाणात आल्याची कबुलीही त्यांनी दिली. त्यामुळे खवय्यांप्रमाणे विक्रेतेही आंब्याचे दर कमी होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.>सध्या आंब्याचा बाजार थंडावलेला आहे. सध्या फक्त ३० टक्के आंबा बाजारपेठेत आला आहे. दरवर्षी कर्नाटक, बंगळूरचा आंबाही बाजारात येतो. यंदा फक्त रत्नागिरी, देवगड आणि अगदी थोडाफार अलिबागचा आंबा बाजारात आलेला आहे. दर वधारलेले असल्याने नेहमीचा ग्राहकही आंबा खरेदीकडे वळत नाहीए. त्यामुळे आंबा विक्रेत्यांमध्ये साहजिकच नाराजी आहे. हे दर १० मे पर्यंत राहतील. वातावरण चांगले राहीले तर आंब्याची आवक वाढेल आणि दरही कमी होतील.- योगेश सोनार, आंबे विक्रेते>ओखी चक्रीवादळामुळे आंबे कमी आले आहेत. पहिला मोहोर आला तेव्हा अवकाळी पाऊस आला आणि मोहोर गळून पडला. त्यामुळे सध्या मार्केटमध्ये आंबे कमी प्रमाणात आहेत. दरवर्षी १०० ते १२५ पेटी विक्रीसाठी आणल्या जातात. यंदा मात्र ७० पेट्याच आणल्या जात आहेत. - सचिन मोरे, आंबे विक्रेते
हापूस रूसला, पेटीत बसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 3:17 AM