लोकमत न्यूज नेटवर्कमाथेरान : हिरवेगार, शांत आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरानची ओळख आहे. मात्र माथेरानमध्ये काही धनाढ्यांनी वनराई नष्ट करण्याचा विडा उचलला आहे. जुन्या शेतघरांच्या जागी आता मोठी हॉटेल्स, तसेच बंगले बांधले जात आहेत. त्यातून पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. मात्र याकडे वनविभाग कानाडोळा करीत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फायदा घेत झाडांची बेसुमार कत्तल होत असून, रस्त्यांसाठी वाटा मोकळ्या केल्या जात आहेत. संबंधितांना वनराई नष्ट करण्याची मुभा दिली आहे का, असा सवाल पर्यावरणप्रेमी करीत आहेत.
येथील डंपिंग ग्राऊंडकडे जाणाऱ्या रस्त्यालगत सेट व्हिला हा बंगला असून, या बंगल्याच्या आवारातील जवळपास सर्वच झाडी जमीनदोस्त केल्याचे दिसून येत आहे. हा बंगला एकेकाळी आजूबाजूला असणाऱ्या गर्द झाडीमुळे दृष्टीस येत नव्हता. तो आता स्पष्टपणे दिसत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाडी नष्ट केली आहे. वनखात्याला याबाबत अनेकदा नागरिकांकडून सूचित करण्यात आले होते. परंतु, धनाढ्यांना जंगलतोड करण्यासाठी मुभा दिली आहे की काय, असा प्रश्न स्थानिकांमधून उपस्थित होत आहे. तर बंगले धारकांच्या मालकीच्या मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या बंगल्याचे नूतनीकरण केले जात असून, सर्व डेब्रिज रस्त्याच्या बाजूला टाकण्यात येत आहे. त्यामुळे पर्यावरणाला बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे.
अनेक धनाढ्य मंडळींनी दोन दशकांपासून येथे जुने बंगले विकत घेण्याचा सपाटा लावला असून आता तेथे थ्री स्टार हॉटेल्स उभारली आहेत, तर काही हॉटेल धारकांनी मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या वनखात्याच्या जागेवर अतिक्रमण करून ती जागा काही प्रमाणात अडवली आहे. एकंदरीत वनखात्याच्या या कारभारामुळे येथील वनसंपदा लोप पावत चालली आहे.
संयुक्त वनव्यवस्थापन समितीमार्फत २०२० मध्ये जून महिन्यात सेंट व्हिला या बंगल्यात तत्कालीन वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत सर्व्हे करण्यात आला होता. त्यावेळी पूर्वीच्या सर्व्हेपेक्षा काही प्रमाणात झाडे कमी झाल्याचे आढळून आले. परंतु, राजकीय हस्तक्षेपामुळे वनविभागाला मर्यादा निर्माण झाल्या आहेत. - योगेश जाधव, अध्यक्ष, संयुक्त वनव्यवस्थापन समिती, माथेरान