तलवाडा : विक्रमगड ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर करण्याचा नगरविकास खात्याकडे प्रलंबित असलेला प्रस्ताव निवडणुकीपूर्वी मंजूर करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे येथील मान्यवरांच्या शिष्टमंडळाने केली आहे.शासानाच्या घोषणेप्रमाणे शहर व लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर करण्याचे प्रस्ताव मागविण्यात आले होते, त्यानुसार हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. विक्रमगड ग्रामपंचायतीचे सद्यस्थित नगरपंचायती प्रमाणे २०११ च्या जनगणनेनुसार ८५०० लोकसंख्येप्रमाणे १७ वार्ड आहेत़ त्यामुळे विक्रमगडकरांना नगरपंचायत हवी आहे व ग्रामपंचायत निवडणुकीपुर्वीच नगरपंचायती घोषणा करावी अशी मागणी आता जोर धरु लागली आहे़ सर्व तालुके ग्रामापंचायतीतून नगरपंचायतीमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यानुसार महाराष्टत अनेक ठिकाणी तालुका ग्रामपंचायती नगर पंचायती होऊन निवडणुकाही झाल्या आहेत. त्याचवेळेस ठाणे जिल्हयांचे विभाजन झाल्याने व ठाणे जिल्हा परिषदेची व पंचायत समित्यांची निवडणुक न झाल्याने तसेच त्याबाबतचा वाद न्यायालयात प्रलंबित असल्याने तालुक्यात नगरपंचायत स्थापनेचा प्रस्ताव लांबणीवर गेला. परंतु त्याचवेळी ठाणे जिल्हयात मुरबाड, शहापूर,या नगरपंचायती अस्तित्वात आल्यात. जर नगरपंचायतीचा प्रस्ताव ग्रामपंचायत निवडणूक झाल्यावर मंजूर झाल्यास ग्रामपंचायत बरखास्त करुन नगरपंचायतीच्या निवडणुकीला पुन्हा एकदा सामोर जावे लागू शकते. त्यामुळे नगरपंचायतीची निर्मिती निवडणुकीपूर्वी व्हावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे.
विक्रमगडकरांना हवी नगरपंचायत
By admin | Published: February 08, 2016 2:27 AM