नालासोपारा : पूर्वेकडील ओव्हर ब्रिजच्या खाली आणि रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बसलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांना उठवण्यासाठी गेलेल्या मनपा कर्मचारी आणि फेरीवाल्यांमध्ये हमरीतुमरी झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली आहे. तुळींज पोलिसांनी हस्तक्षेप करून अनधिकृत फेरीवाल्यांना उठवून लावले आहे. तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानाव्यतिरिक्त उघडी असणारी दुसरी दुकाने मनपा कर्मचारी आणि पोलिसांनी बंद केली. वीकेंड लॉकडाऊन संपल्यानंतर सोमवारी सकाळी नालासोपारा पूर्वेकडील परिसरात ९० टक्के दुकाने उघडण्यात आली होती. तर अनधिकृत फेरीवाले ओव्हर ब्रिजच्या खाली व रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनधिकृतपणे बसून व्यवसाय करत होते. या रस्त्याने चालता येत नसल्याने अनेकांनी वसई-विरार महापालिका आणि पोलीस प्रशासनाला संपर्क साधला. यानंतर कारवाईसाठी आलेल्या मनपा कर्मचाऱ्यांसोबत या फेरीवाल्यांनी हुज्जत घातली. तुळींज पोलिसांनी तातडीने मनपा कर्मचाऱ्यांसोबत जाऊन कारवाई केली व रस्ता नागरिकांना चालण्यासाठी मोकळा केला. तसेच कपडे, भांडी, मोबाइल दुकाने व इतर अतिआवश्यक सेवेत समाविष्ट नसणारी उघडी दुकाने विनंती करून बंद करण्यास सांगितले. यानंतर दुकाने उघडी दिसली तर गुन्हे दाखल करून कारवाईचा इशाराही दुकानदारांना देण्यात आला आहे. फेरीवाले पुन्हा बसू नयेत म्हणून पोलीस कर्मचारी आणि आरसीपीचे प्लाटून बंदोबस्तासाठी लावण्यात आले आहे.
फेरीवाल्यांसाठी मनपातर्फे ओस्तवाल नगरी, सेंट्रल पार्क मैदान आणि मोरेगाव तलावाच्या मागे जागा देण्यात आली आहे. परंतु हे फेरीवाले तिथे न जाता स्टेशनच्या आजूबाजूच्या परिसरात अनधिकृतपणे रस्त्यावर बसून वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. - विजय पाटील, अधिकारी, ब प्रभाग, महानगरपालिका
अतिआवश्यक सेवेव्यतिरिक्त दुकाने उघडी होती, त्यांना विनंती करून दुकाने बंद करण्यास सांगितले आहे. पुन्हा दुकाने उघडली तर गुन्हा दाखल करून कारवाई करणार. - राजेंद्र कांबळे, पोलीस निरीक्षक, तुळींज पोलीस ठाणे