लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : केडीएमसीतील सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडून आंदोलन छेडण्याचे सत्र सुरूच आहे. मात्र, या आंदोलनानंतरही फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायम आहे. सलग दुसऱ्या सोमवारीही ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांनी फेरीवाल्यांविरोधात उपोषण छेडले आहे. या वेळी त्यांच्यासोबत शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी, महिला संघटक कविता गावंड आदी सहभागी झाले आहेत.एकीकडे शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होत असताना पालिकेतील सत्ताधारी नगरसेवकाला पुन्हा छेडावे लागलेले लाक्षणिक उपोषण चर्चेचा विषय ठरले. म्हात्रे फेरीवालाप्रश्नी सहा महिने दरसोमवारी ४८ तास साखळी उपोषण छेडणार आहेत. म्हात्रेंनी अधिकाऱ्यांना ठिकठिकाणी कसा हप्ता मिळतो, याची यादीच जाहीर केली आहे. अधिकाऱ्यांची लाचलुचपत विभागाकडून चौकशी व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. म्हात्रे १२ जूनला उपोषणाला बसले असताना महापौरांनी त्यांच्याशी चर्चा केली होती. उपायुक्त सुरेश पवार यांनीही कारवाईचे आश्वासन त्यांना दिले होते. यावर, म्हात्रे यांनी उपोषण सोडले होते. परंतु, ठोस कारवाई होत नसल्याने म्हात्रे यांनी पुन्हा सोमवारी स्कायवॉकखाली उपोषणाला प्रारंभ केला. पवार यांनी दिशाभूल केल्याचा त्यांचा आरोप आहे.
फेरीवाला आणि... उपोषणकर्ते जैसे थे
By admin | Published: June 20, 2017 6:19 AM