ठाणे : मोटारसायकल घसरल्याने जगदीश यादव हा मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली होती. त्याला कासारवडवली वाहतूक नियंत्रण उपशाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याचवेळी तिथे पडलेली ७० हजारांची रोकड, अडीच लाखांचे दागिने आणि मोबाइल असा तीन लाख ३० हजारांच्या ऐवजाची पिशवीही जगदीश यांची पत्नी मीरा यांच्याकडे सुखरूप सुपूर्द केल्याने वाहतूक पोलिसांचे कौतुक होत आहे.
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २४ मार्चला सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास नागला बंदर, घोडबंदर मार्गावरील सेवा रस्त्यावर जगदीश रामलाल यादव (५०) यांची मोटारसायकल घसरल्याने ते रस्त्यावर जखमी अवस्थेमध्ये पडल्याची माहिती पोलीस हवालदार राजेंद्र मोरे, पोलीस नाईक अविनाश वाघचौरे, अमलदार बबन खेडेकर आणि नवनाथ थोरवे यांना मिळाली. ही माहिती मिळताच, हे चौघेही तत्काळ घटनास्थळी पोहोचून राहुल केवट याच्या मदतीने जगदीशला एका रिक्षात बसवून जवळच्याच एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याचवेळी रस्त्यावर पडलेली मोटारसायकल त्यांनी रस्त्याच्या कडेला घेतली. घटनास्थळापासून जवळच पडलेली एक पिवळ्या रंगाची पिशवीही पोलीस नाईक वाघचौरे यांना मिळाली. त्यामध्ये काही रोकड, सोन्याचे दागिने आणि दोन मोबाइल आढळले. ही बाब या कर्मचाऱ्यांनी तत्काळ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांच्या निदर्शनास आणून दिली. आव्हाड यांनी ही बाब पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्यासह मुख्य नियंत्रण कक्ष आणि वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षाला दिली. जखमीच्या नातेवाईकांना हा ऐवज देण्याचे आदेश उपायुक्त पाटील यांनी दिले. ही माहिती मिळाल्यानंतर जगदीश यांची पत्नी मीरा यादव (४७) या रात्री ८ वाजता कासारवडवली वाहतूक शाखेत दाखल झाल्या. त्यांची ओळख पटल्यानंतर पोलीस निरीक्षक आव्हाड यांनी रोख ७० हजार रुपये, ५० ग्रॅम वजनाचे अडीच लाखांचे सोन्याचे दागिने, दहा हजारांचे दोन मोबाईल, पॅनकार्ड आणि आधारकार्ड असा तीन लाख ३० हजारांचा ऐवज मीरा यांच्याकडे सुखरूप सुपूर्द केला. पोलिसांच्या या तत्परतेमुळे त्यांनी वाहतूक पोलिसांचे विशेष आभार मानले. दरम्यान, पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केल्यामुळे गुरुवारी जगदीश यांच्या हातावर यशस्वी शस्त्रक्रियाही पार पडल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली.