ठाणे : दिवाळीच्या पूर्वसंध्येला म्हणजे २६ आॅक्टोबरला पत्नी वैजयंती आणि मुलगा पृथ्वी यांच्यावर कोयत्याने हल्ला करणाऱ्या प्रमोद कान्हा पाटील याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. सुरुवातीला पोलिसांनी हा हल्ला कौटुंबिक कारणावरून झाल्याचे सांगितले होते. मात्र, तपासात तो चारित्र्याच्या संशयावरून केल्याचे निष्पन्न झाले आहे.
दिवाळीच्या पूर्वसंध्येला म्हणजे २६ आॅक्टोबरला रात्री वैजयंती यांच्यावर प्रमोद याने किचनमध्ये कोयत्याने हल्ला केला. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मुलगा पृथ्वी हा आईच्या मदतीसाठी धावला असता त्याच्याही डोक्यावर आणि हातावर त्या कोयत्याने प्रमोदने हल्ला केला. हा हल्ला पाहून तक्रारदार राज याने आजूबाजूच्या लोकांना बोलावल्यावर त्यांचा आवाज ऐकून प्रमोद याने पळ काढला होता. मात्र, काही तासांमध्ये गुन्हा दाखल झाल्यावर त्याला पोलिसांनी अटकही केली होती. तर, जखमी झालेल्या त्या मायलेकांना वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल केले होते. कौटुंबिक वादातून हा हल्ला झाल्याचा संशय पोलिसांनी तेव्हा व्यक्त केला होता. मात्र, पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत असल्याची प्रमोद याने कबुली दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. दरम्यान, पोलीस कोठडीची मुदत संपल्याने प्रमोद याची रवानगी १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत झाली असून त्या मायलेकाची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी लोकमतशी बोलताना दिली.