- प्रज्ञा म्हात्रे ठाणे : ‘मला कीर्तनाची आवड आहे. मी कीर्तन करायला जाते. परंतु, मी जे कीर्तन करते, ते मला वाचता यावे. मला ते शब्द बोलता येण्याबरोबरच, वाचता यावे’, अशा शब्दांत विमलमावशींनी त्यांची लिहिण्यावाचण्याची आवड बोलून दाखवली आणि त्या दिवसापासून संध्याताई सावंत यांच्या शाळेत त्या भरती झाल्या. जेमतेम सहा महिन्यांत विमलमावशींना लिहावाचायला शिकवण्याचा निर्धार संध्यातार्इंनी केला आहे.विमलमावशी या संध्यातार्इंकडे काम करतात. निरक्षरांना साक्षर करण्याचा विडा उचललेल्या संध्याताई आदिवासीपाड्यातील महिला, मुलींसह आपल्या घरात कामाला येणाऱ्या मावशींनाही ‘अ’, ‘आ’, ‘इ’, ‘ई’ चे धडे शिकवत आहेत.माझे सामाजिक कार्य मावशींना माहीत होते, त्यामुळे त्यांनी माझ्याकडे शिकण्याची इच्छा व्यक्त केली. बाराखडीपासून त्यांनी शिकण्यास सुरुवात केली. आता त्या दोन अक्षरी शब्द गिरवत आहेत. गेले दोन महिने त्यांची शिकवणी सुरू आहे, असे संध्यातार्इंनी सांगितले. घरातील काम झाल्यावर संध्याताई या विमलमावशींची दररोज अर्धा तास शिकवणी घेतात. आपल्या मुलीला इंग्रजी शिकवायला यावे, म्हणून त्यांच्याकडे घरकामाला येणाऱ्या सीमा यांनीही त्यांच्याकडे इंग्रजी शिकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनाही संध्याताई इंग्रजीचे धडे देणार आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रात १० वर्षे काम केल्यावर २०१२ साली संध्यातार्इंनी नोकरीला रामराम केला. नोकरी सोडल्यावर त्यांनी महिला आणि मुले यांच्यासाठी काम करण्याचे ठरवले. त्यांनी सुरुवातीला स्वतंत्रपणे आदिवासी व झोपडपट्टीतील मुलांना शिकवले, खेळण्यांचे वाटप केले. पनवेलच्या रामवाडी येथील आदिवासीपाड्यात मैत्रिणीसोबत जाऊन पिण्याची, शौचालयाची सोय केली. तेथील महिलांना रोजगार मिळावा म्हणून कागदी पिशव्या बनवण्याचे, तर युवकांना रोजगार मिळावा म्हणून स्वखर्चातून सौरऊर्जेचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवले. ठाण्यातील सिग्नलशाळेतील मुलांना शिकवण्याबरोबर त्यांनी अनेक सामाजिक संस्थांबरोबर काम केले. वसतिगृहात राहणाºया आदिवासी मुलींना चित्रकला, हस्तकलेचे शिक्षण त्या देत आहेत. गेल्या वर्षी त्यांनी स्वत:ची मातृसेवा फाउंडेशन ही संस्था सुरू केली. ज्या महिला निरक्षर आहेत, त्यांना साक्षर करणे आणि ज्या साक्षर आहेत, त्यांना स्वावलंबी बनवणे, हा या संस्थेमागचा हेतू आहे. आदिवासीपाड्यातील महिलांना साक्षर करण्याचा विडा उचलला आहे.>संस्थेच्या महिला या धर्माचापाडा येथे स्थायिक झालेल्या महिलांना शिकवण्यास जातात. पालिका शाळा क्र. ५५ मध्ये त्यांनी प्रयोगशाळा, वाचनालय सुरू केले आहे. या शाळेतील मुली आणि त्यांच्या पालकांना महिला दिनानिमित्त स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत.वसतिगृहातील मुलींना चित्रकला, हस्तकला शिकवितात.
मोलकरणीस साक्षर करून त्यांनी दिली नवी ओळख
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 12:46 AM