लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना सर्व नेते ‘मातोश्री’वर येत होते. आता त्यांचा वारसा सांगणारे आपले नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर करा अशी मागणी करीत दिल्लीच्या गल्लोगल्ली फिरत आहेत. एवढी त्यांची केविलवाणी अवस्था झाली आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख टाळत लगावला.
टेंभीनाक्याच्या दुर्गेश्वरीच्या आगमन मिरवणुकीत मुख्यमंत्री शिंदे सहभागी झाले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, बाळासाहेबांनी ज्यांना जवळ उभे केले नाही, त्यांच्याशी त्यांनी घरोबा केला आणि आज जे लोक पाकिस्तानाची भाषा बोलतात त्यांच्या मांडीला मांडी लावून हे बसले आहेत. राज्याचा विकास न करणाऱ्या, प्रकल्प बंद करणाऱ्या अशा असुरांचा नि:पात देवीकडून होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
दोन वर्षांत देवीच्या आशीर्वादाने अनेक प्रकल्प आमच्या सरकारने पूर्ण केले. अडीच वर्षे महाविकास आघाडीचे काम आणि दोन वर्षांत महायुतीने केलेल्या कामाचे नागरिकांनीच मूल्यमापन करावे. महायुती १०० टक्के जिंकणार, असा दावाही त्यांनी केला.