मीरारोड - झाडांना इजा पोहचवणे कायद्याने गुन्हा असला तरी मीरा भाईंदर महापालिकेच्या मुख्यालयातच झाडांना खिळे ठोकून त्यावर सीसीटीव्ही बसवणे, केबल टाकणे यासारखे प्रकार केल्याचे आढळून आले होते. तक्रार होताच पालिकेने झाडांना ठोकलेले खिळे आदी काढले आहे. परंतु अद्याप संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यावर कारवाई करण्यास पालिका उपायुक्त व वृक्ष अधिकाऱ्यांनी टाळाटाळ चालवली आहे.
मीरा भाईंदरमध्ये पर्यावरणाचा ऱ्हास केल्या प्रकरणी अगदी पालिका अधिकारी, कर्मचारी, ठेकेदारापासून माजी आयुक्तांवर गुन्हे दाखल आहेत. त्यातच झाडांच्या बाबतीत देखील मनमानी छाटणी व झाडांची तोडीवरून पालिका नेहमीच आरोपीच्या पिंजऱ्यात असते. विना परवानगी फांद्या वा झाड तोडणे तसेच झाडांवर खिळे ठोकणे, केबल टाकणे, फलक लावणे, विद्युत रोषणाई करणे आदी प्रकार कायद्याने गुन्हा आहे. याबाबत पालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग त्यांच्याकडे तक्रारी केल्या शिवाय हालचाल करत नाही.
बांधकाम विभाग व त्यांच्या ठेकेदाराकडून तर झाडांना डांबरीकरण व काँक्रीटीकरण केले जात असूनही गुन्हे दाखल करत नाहीत. त्यातच भाईंदर पश्चिमेस महापालिका मुख्यालयात असलेल्या झाडांवरच मोठ्या प्रमाणात खिळे ठोकण्यात आले होते. सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी केबल तारा टाकण्यासाठी हे खिळे ठोकण्यात आले. गंभीरबाब म्हणजे पालिका मुख्यालयात महापौर, आयुक्तां पासून पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी व नेते मंडळी रोज येत जात असतात तरी देखील त्यांचे याकडे लक्ष गेले नाही याचे लोकांना आश्चर्य वाटत आहे.
झाडांवर खिळे ठोकून बसवलेले कॅमेरे व टाकलेल्या केबल पालिकेच्या निदर्शनास आणून दिल्यावर आता खडबडून जाग आल्याने झाडांना ठोकलेले खिळे काढण्यात आले आहेत. परंतु या प्रकरणी ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांच्यावर महाराष्ट्र झाडांचे जतन संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा. अधिकाऱ्यास निलंबित करावे अशी मागणी नागरिकांनी केली असूनही महापालिका मात्र कारवाईस टोलवाटोलवी करत आहे.