------------------------
८२ हजारांची रोकड चोरीला
ठाणे : हिरानंदानी इस्टेट भागातील एका बंद असलेल्या वॉइन शॉपचे शटर उचकटून चोराने दुकानातील कॅश काउंटरमधील ८२ हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केल्याची घटना घडली आहे. ही घटना २९ जुलै ते ३० जुलै रात्री ९ च्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
-----------------------------------------
अपघातात एकाचा मृत्यू तर एक जण जखमी
ठाणे : मुंबईकडून नाशिककडे जात असताना ‘रुस्तमजी’ येथील रस्त्यावर दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकीत दुचाकीवरील चालक निजामउद्दीन नईमुद्दीन शेख (४९ रा. काजूपाडा, कुर्ला) हे ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्यांचा साथीदार सुरेश वाघमारे (३०, रा. साकीनाका) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना ३० जुलैला रात्री १०.३० च्या सुमारास घडली. याप्रकरणी ट्रकचालक लक्ष्मण चव्हाण याच्या विरोधात कापूरबावडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
-------------------------------------------------
सहायक पोलीस आयुक्त संजय शिंदे निवृत्त
ठाणे : ठाणे वाहतूक शाखेतील भिवंडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संजय शिंदे हे ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन वाहतूक शाखा पोलीस उपायुक्त कार्यालय तीनहात नाका येथे करण्यात आले होते. यावेळी पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ठाणे शहरातील वाहतूक शाखेतील सर्व सहायक पोलीस आयुक्त तसेच वाहतूक शाखेतील सर्व उपविभागाचे प्रभारी पोलीस निरीक्षक उपस्थित होते.
------------
वाहतूक पोलिसांकडून पूरग्रस्तांना मदत
ठाणे : ठाणे शहर वाहतूक शाखेच्या अंतर्गत डोंबिवली उपविभागाचे प्रभारी पोलीस निरीक्षक गिते यांनी व सर्व वाहतूक विभागातील कर्मचारी तसेच चिपळूणच्या भूमिपुत्रांच्या वतीने चिपळूण येथील पूरग्रस्तांना सामाजिक बांधीलकीच्या नात्याने तांदूळ, गहू, डाळ, तेल, कपडे, पाणी यासारख्या जीवनावश्यक वस्तू पाठविल्या आहेत. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या टेम्पोला हिरवा झेंडा दाखविला.
--------------