ठाणे : लहानपणापासूनच वाचण्याची आवड होतीच. आताही व्यस्त कामामध्ये वेळ काढून मी जाणीवपूर्वक चांगल्या पुस्तकांचे वाचन करीत असतो अशा भावना जिल्हाधीकारी राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केल्या.
निवेदिका साधना जोशी यांच्या निवासस्थानी श्रावणसरी...चहा आणि पुस्तक हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी नार्वेकर साहेब उपस्थित होते. त्यांनी कथा, कविता ऐकल्या. ते म्हणाले, याच ठाणे शहरातील नामवंत शाळेत म्हणजेच बेडेकर हायस्कूल मध्ये मी दहावीसाठी दाखल झालो..तेव्हा माझ्या बाजूला बसलेले चिटणीस सर हे मुख्याध्यापक होते..त्यांनी माझी सर्टिफिकेट पाहून मला त्वरित प्रवेश दिला. बेडेकर शाळेतल्या दिवसांच्या अनेक आठवणी माझ्याजवळ आहेत. या शाळेने मला समृध्द केले. माझी पहिली बदली दापोलीला झाली. तेव्हा शाळेत वाचलेल्या श्री ना पेंडसे यांच्या गारंबीचा बापू ही कादंबरी वाचली होती त्यातील स्थळे मी दापोलीत आल्यावर पाहिली आणि धन्य झालो. यावेळी कविवर्य अरुण म्हात्रे, ज्येष्ठ लेखक, कथाकार अशोक चिटणीस, निवेदक राजेंद्र पाटणकर, निवेदक, निसर्ग प्रेमी मकरंद जोशी, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ, आस्वादक सुमेधा बेडेकर, कवी, अनुवादक उदय भिडे, योगेश जोशी, कवयित्री माधुरी बागडे, दीपक धोंडे, प्रकाश पांचाळ, उत्तम पवार, राजेश जाधव आदी उपस्थित होते..कार्यक्रमाची सुरुवात बेडेकर यांच्या इशस्तवनाने झाली. प्रास्ताविक रामदास खरे यांनी केल्यावर व्यास क्रिएशन्सचे निलेश गायकवाड यांनी व्यासचा प्रवास आणि आगामी योजना याबद्दलची माहिती दिली. कविता, गाणी, कथा, लेख, प्रवास वर्णन, किस्से या माध्यमातून सारे कलाकार व्यक्त होऊ लागले. अगदी शेवटी जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी आपल्याला वाचनाची गोडी कशी लागली, शाळे मधल्या आठवणी, पुढे वेगवेगळ्या प्रकारची जबाबदारी बजावताना आलेले अनुभव सांगितले. निलेश गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.