- जान्हवी मोर्ये । लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : वेगवेगळ््या अडचणींवर मात करत, प्रचंड कष्ट करत दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवणाऱ्यांच्या यशोगाथा आपण वाचतो. पण सातत्याने कॅन्सरशी झुंज देत आणि परीक्षेच्या आदल्या दिवशी ब्रेन ट्यूमरचे निदान झाल्याने खचून न जाता परीक्षा देणाऱ्या डोंबिवलीच्या सागर परमार या विद्यार्थ्याने दहावीत ७८ टक्के गुण मिळवत या आजारालाच वाकुल्या दाखवल्या. रोज पेपर दिल्यानंतर रेडिएशन घेत, प्रचंड थकव्यावर मात करत त्याने त्याही अवस्थेत पेपर दिले आणि जिद्दीने यश खेचून आणले. सागर हा डोंबिवली पश्चिमेत जुन्या डोंबिवली परिसरात राहतो. तो ज्युनिअर केजीपासून चंद्रकांत पाटकर शाळेत इंग्रजी माध्यमात शिकतो. सहावीच्या परीक्षेनंतर सुट्टी सुरू असतानाच त्याला कॅन्सरची लागण झाली. पायाला कॅन्सर झाला होता. त्याला सतत उपचारासाठी जावे लागत असल्याने सातवीची परीक्षा देता आली नाही. घरी अभ्यास करून त्याने थेट आठवीची परीक्षा दिली. आठवीत पुन्हा कॅन्सरचा जास्त त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला नववीची परीक्षा देता आली नाही. दोन वर्षे तो नववीचा अभ्यास करत राहिला. पण जिद्द सोडली नाही. त्याने दहावीचा टप्पा गाठला. दहावीच्या परीक्षेला एक दिवस शिल्लक असताना त्याला बे्रन टयूमर झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. परीक्षा सुरू असतानाच त्याच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरु होते. दुपारी दोनला पेपर संपला की तो रेडीएशनसाठी टाटाला जात होता. या उपचारानंतर त्याला प्रचंड थकवा जाणवत असे. त्यामुळे आजारपणापूर्वी केलेल्या अभ्यासाची केवळ उजळणी करण्यापलिकडे त्याच्या हाती काही नव्हते. एकढ्या त्रासानंतरही त्याने एकही पेपर चुकविला नाही. उपचारातही खंड पडू दिला नाही. त्याला इंग्रजीत ७२, गणितात ७१, मराठीत ७०, हिंदीत ८५, सामाजिक विज्ञानात ८४ आणि सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजीत ८१ गुण मिळाले. चांगले गुण मिळतील, असा विश्वास त्याला वाटत होता. त्यामुळे ७८ टक्के गुण मिळाल्याचे कळताच आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सागरचे वडील किशोर फोटोग्राफर आहेत, तर आई हिना गृहिणी आहेत. आईने सागरची खूप काळजी घेतली. त्याला पूरक आहार दिला. त्याच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरु होते. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या अमिता भाटिया यांनी सागर व त्याच्या आई-वडिलांचे चांगल्या प्रकारे समुपदेशन केले. त्याचा त्याला खूप उपयोग झाला. आजारपणात अभ्यास करुन परीक्षा दिली नाही तरी चालेल, असे सांगून त्याच्यावर आई-वडिलांनी कोणतेही दडपण आणले नव्हते. पण सागरने कोणत्याही परिस्थितीत हार मानायची नाही, असे मनाशी ठरवले होेते. यशात शाळा, आई-वडील आणि डॉक्टरांचा मोठा सहभाग असल्याचे सागरने सांगितले. त्याला एमबीए किंवा हॉटेल मॅनेजमेंट करायचे आहे. प्रकृतीच्या सुधारणा तपासण्यासाठी केलेल्या त्याच्या चाचण्यांचा अहवाल महिनाभरात मिळणार आहे.
कॅन्सरशी झुंज देत तो झाला दहावी पास
By admin | Published: June 14, 2017 2:57 AM