ठाणे : सावरकरनगरातील ज्ञानोदय हिंदी विद्यालयाच्या मुख्याध्यापकाने रविवारी रात्री प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप शाळेच्याच एका शिक्षकाने केला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शिक्षकाच्या तक्रारीवरून मुख्याध्यापकाविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.ज्ञानोदय हिंदी विद्यालयामध्ये महाजन प्रजापती हे कनिष्ठ शिक्षक आहेत. या विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश मिश्रा यांच्याविरोधात त्यांनी शासनदरबारी अनेक तक्रारी केल्या आहेत. मिश्रा हे नऊ वर्षांपासून शाळेत एकही दिवस हजर न राहता केवळ मस्टरवर सह्या करून वेतन घेत असल्याची प्रजापती यांची तक्रार होती. मिश्रा यांचे वागळे इस्टेटमध्ये स्वत:चे विद्यालय असून त्यांचा शिक्षकांना जाच असल्याचा गंभीर आरोपही प्रजापती आणि अन्य तक्रारदारांनी केला होता.या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री १०.३०च्या सुमारास महाजन प्रजापती जेवण झाल्यानंतर सावरकरनगरातील पानाच्या दुकानावर गेले असता चौघांनी त्यांच्यावर जबर हल्ला चढवला. तलवारीने केलेल्या मारहाणीत प्रजापती गंभीर जखमी झाले. या वेळी मुख्याध्यापक मिश्राही तिथे होते, असा आरोप प्रजापती यांनी केला. या हल्ल्यात प्रजापती गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध सुरू असल्याचे वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वपोनि प्रदीप गिरधर यांनी सांगितले.
कनिष्ठ शिक्षकावर मुख्याध्यापकाचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 1:59 AM