जितेंद्र कालेकर ठाणे : ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार आत्महत्या प्रकरणातील कथित आरोपी सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) एस. बी. निपुंगे यांच्यावर प्रशासकीय कारवाईला पोलीस आयुक्तालयाने सुरुवात केली आहे. ते वैद्यकीय रजेच्या कारणास्तव गेल्या आठवडाभरापासून गैरहजर आहेत. हजर व्हा, अन्यथा तुमच्यावर प्रशासकीय कारवाई केली जाईल, अशा आशयाची नोटीस त्यांच्या पुणे येथील निवासस्थानी बजाविल्याची माहिती सूत्रांनी दिली.त्यांनी वैद्यकीय रजा घेतली असली, तरी त्याबाबतची कोणतीही अधिकृत कागदपत्रे दिलेली नाहीत. गेले सात दिवस त्यांची वाट पाहिल्यानंतर, मुख्यालय-२ चे उपायुक्त पालवे यांनी त्यांना बुधवारी पुणे येथील निवासस्थानी नोटीस बजावली आहे.‘आपण सिक रिपोर्ट केला आहे. मात्र, मेडिकल रिपोर्ट दिले नाहीत. एक तर मेडिकल रिपोर्ट सादर करा किंवा स्वत: कर्तव्यावर हजर व्हा. या दोन्हींपैकी काहीच केले नाही, तर तुमच्यावर पुढील प्रशासकीय कारवाई केली जाईल,’ असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.तर कारवाई...विनाकारण गैरहजर राहिल्यास, वैद्यकीय कारणातही तथ्य आढळले, नाहीतर निपुंगे यांना सक्त ताकीद, सक्तीची रजा किंवा थेट निलंबनापर्यंतही कारवाई होऊ शकते, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने दिली.त्यामुळे आत्महत्येच्या प्रकरणात निपुंगेंविरोधात कळवा पोलीस ठाण्याच्या कलम ३०६च्या प्रकरणात जर तथ्य आढळले, तर त्यांच्यावर अटकेचीही कारवाई होऊ शकते, असेही या अधिकाºयाने सांगितले.
निपुंगेंवर प्रशासकीय कारवाईला सुरुवात, हजर होण्याची मुख्यालय प्रमुखांची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 4:25 AM