ठाणे : ठाणे महानगरपालिका मुख्यालयावरील शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणाऱ्या शिल्पचित्राची वारंवार डागडुजी न करता नव्याने संकल्पचित्र बनवून शिल्प तयार करावे, अशा मागणीचे निवेदन महापौर नरेश म्हस्के यांना सकल मराठा क्र ांती मोर्चा ठाणेचे अध्यक्ष सुधाकर पतंगराव व पदाधिकाऱ्यांनी शनिवारी दिले.
यावेळी सद्य:स्थितीत असलेल्या शिल्पचित्राच्या डागडुजीऐवजी संकल्पचित्र तयार करून दिग्गज कलादिग्दर्शकांकडून ते तयार करून बसवावे. यासाठी तत्काळ निविदा प्रसिद्ध करण्याच्या सूचना महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिल्या.यावेळी महापौरांनी नगरअभियंता रवींद्र खडताळे व सकल मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाºयांशी संकल्पचित्राबाबत महापौर दालनात तत्काळ चर्चा केली.
मुख्यालयावरील शिल्पचित्राबाबत पाहणी करण्यासाठी महापालिकेने नेमलेल्या तज्ज्ञांनीही सदरचे शिल्पचित्र नव्याने बनविण्याबाबत सूचित केले होते. त्यामुळे या कामास विलंब न करता महापालिका मुख्यालयावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे संकल्पचित्र हे त्या क्षेत्रातील दिग्गज कलादिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार यांच्याकडून मागवून त्या धर्तीवर नामवंत शिल्पकारांकडून बनवून ते बसविण्याबाबतची सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या.
ठाणे महानगरपालिका मुख्यालयावर असलेल्या शिल्पचित्राच्या डागडुजीचे काम केले जाणार होते. परंतु मध्यंतरी निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडले असल्याचे नगरअभियंत्यांनी सांगितले.