ठाणे : जिल्ह्यातील गावपाड्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत आता वाढ होताना आढळून येत आहे. त्यास आळा घालणाऱ्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीची खात्री करून घेण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूपाली सातपुते जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना अचानक भेट देऊन आरोग्य यंत्रणेची झाडाझडती सुरू केली आहे. कोनगाव आरोग्य केंद्राला गुरुवारी त्यांनी भेट देऊन यंत्रणेला चांगलेच धारेवर धरले. यावेळी कोनगावच्या सरपंच डॉ. रूपाली कराले, ग्रामस्थ उपस्थित होते.
शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेसह जिल्हा परिषदेने विविध उपाययोजना हाती घेऊन कोरोनावर मात करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याद्वारे आतापर्यंत झालेले काम आणि त्यातून मिळालेले यश आदींची शहानिशा सातपुते स्वत: रुग्णालयात जाऊन करीत आहे. रुग्णांसह गावकऱ्यांच्या भेटी घेऊन मोहिमेची व्यापकता वाढवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. कुटुंब सर्वेक्षणातून एकही कुटुंब सुटणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांच्याकडून दिल्या जात आहे. ग्रामस्थांना रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप सुरू असल्याची खात्री केली जात आहे. यावेळी सहायक गटविकास अधिकारी अविनाश मोहिते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग चौरे यांच्याकडून भिवंडी तालुक्यातील एक लाख २९ हजार १४० कुटुंबांच्या पाच लाख ५१ हजार ४१८ लोकसंख्येपैकी किती सर्वेक्षण झाले, याचा आढावा त्यांनी घेतला. यासाठी १८२ पथकांची नेमणूक करण्यासह ५४६ कर्मचारी तालुक्यात सक्रिय असल्याचा दावा ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे.एक लाख ७८ हजार नागरिकांचे सर्वेक्षणमाझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत एक लाख ७८ हजार ३३२ नागरिकांचे, तर ४४ हजार १४१ कुटुंबांचे सर्वेक्षण केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.