ठाणे : रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर येथे पूरपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत कार्यासाठी ठाणे महानगरपालिकेने पाठविलेल्या आरोग्य, घनकचरा, पाणी विभागाच्या पथकांचे प्रत्यक्ष कार्य सुरू झाले असून मंगळवारी पहिल्याच दिवशी साफसफाई, आरोग्य तपासण्यांच्या कामाने वेग घेतला. यामध्ये पहिल्याच दिवशी २५० व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात चिखल्या आजाराचे रुग्ण सापडले असून त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत.
या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सर्व परिसराची साफसफाई करण्यात येत असून फायलेरिया कर्मचाऱ्यांकडून सोडियम हायपोक्लाराईड औषध फवारणी करण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी १० हजार लिटर्स पाण्याचा एक टँकर आणि दोन ट्रक पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या वाटण्यात येत आहेत. यासोबतच महापालिकेच्या पशू वैद्यकीय अधिकारी आणि त्यांची टीम मृत जनावरांचे पंचनामे करून त्यांची तातडीने विल्हेवाट लावत आहेत. उपनगर अभियंता गुणवंत झांबरे आणि आगार व्यवस्थापक दिलीप कानडे यांच्या अधिपत्त्याखाली हे काम सुरू आहे.