मुरबाड : तालुक्यातील खुटल बारागाव येथे महिनाभरापासून डेंग्यूची साथ पसरली आहे. मात्र ही साथ आटोक्यात आणण्यात यश येत नसल्याने जिल्हा आरोग्य विभागही हतबल झाला आहे. दररोज डेंग्यूचे नवीन रुग्ण दाखल होत असून तालुका आरोग्य विभाग आणि शिरोशी प्राथमिक केंद्र सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप खुटल ग्रामस्थांनी केला आहे.तालुक्यातील दुर्गम भागातील खुटल बारागावात महिनाभरापासून डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. डेंग्यूचे रुग्ण सापडल्यापासून ग्रामपंचायतीने गावात दोन तिनदा धूर फवारणी केली. नजीकच्या शिरोशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे या गावात उपकेंद्र आहे.दरवर्षी या उपकेंद्राची दुरु स्ती केली जाते. पण, कर्मचारी राहत नसल्याने आणि संपूर्ण आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असल्याने गावातील डेंग्यूची साथ आटोक्यात येत नसल्याचे ग्रामस्थांचे मत आहे . गावाला लागूनच शासकीय आश्रमशाळा आहे. तेथे तीन-चारशे विद्यार्थी असून त्यांचे आरोग्यही धोक्यात येण्याची शक्यता आहे.खुटल येथील डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. डासांचा उगम कुठे आहे ते सापडत नसल्याने ही अडचण तयार झाली आहे.- श्रीधर बनसोडे ,तालुका आरोग्य अधिकारी, मुरबाड
डेंग्यूपुढे आरोग्य विभाग झाला हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:44 PM