कल्याण : केडीएमसीच्या आरोग्य विभागासाठी संगणकीय विभागाने सॉफ्टवेअर तयार केले होते. टॅबही विकत घेतले होते. मात्र, महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टर त्याचा वापर करत नसल्याने सॉफ्टवेअर व टॅब धूळखात पडून आहेत. अशी बाब शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उघडकीस आली. सभापती राहुल दामले यांनी हा मुद्दा उपस्थित करून त्याचा वापर का केला जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला.
महापालिकेचे कल्याणमध्ये रुक्मिणीबाई आणि डोंबिवलीत शास्त्रीनगर रुग्णालय तसेच १३ नागरी आरोग्य केंद्रे व चार दवाखाने आहेत. त्यातील डॉक्टरांसाठी संगणकीय विभागाने सॉफ्टवेअर तयार केले होते. तसेच त्यासाठी टॅबखरेदी केले होते. रुग्णाचा केसपेपर तयार करणे, त्याला कोणता आजार आहे, कोणत्या प्रकारच्या गोळ्या व इंजेक्शन दिले, याची नोंद करण्याची सोय त्यात होती. तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन यांच्या कारकिर्दीत हा प्रयत्न केला गेला. मात्र, सॉफ्टवेअर आणि टॅबचा वापर होत नसल्याने त्यावर केलेला खर्च वाया गेला आहे, याकडे दामले यांनी लक्ष वेधले. आरोग्य विभागाने संगणकीय विभागाकडे संगणक मागितले होते. मात्र, त्यांनी टॅब दिले. सॉफ्टवेअर तयार केले. परंतु, त्याचा वापर कसा करायचा, याचे प्रशिक्षण डॉक्टर व परिचारिकांना दिले नाही. त्यावर प्रशिक्षणाअभावी त्याचा वापर होत नसल्याचा खुलासा आरोग्य विभागाने केला आहे.
शवविच्छेदनाची सुविधा शास्त्रीनगर रुग्णालयात का सुरू केली जात नाही, असा जाब शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी विचारला. रुक्मिणीबाई रुग्णालयात २१ डॉक्टर, तर शास्त्रीनगर रुग्णालयात १३ डॉक्टर आहेत. शास्त्रीनगरच्या डॉक्टरांना कल्याणला शवविच्छेदनासाठी बोलावून घेतले जाते. कमी डॉक्टर असताना शास्त्रीनगरच्या डॉक्टरांवर सक्ती केली जाते, याचा विचार व्हावा, असा मुद्दा उपस्थित केला. त्यावर शास्त्रीनगर रुग्णालयात जागा नसल्याने शवविच्छेदनाची सुविधा अद्याप सुरू करता आलेली नाही, असे कारण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले.एमएसआरडीसीकडून खर्चवसुलीपत्रीपूल ते दुर्गाडी या मार्गादरम्यान जुलैमध्ये राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) हद्दीत पेव्हरब्लॉक उंचसखल झाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर, या रस्त्यावरील ड्रेनेजची झाकणे दुरुस्तीसाठी तातडीने नऊ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. हा विषय मंजुरीसाठी आला असता हा खर्च राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वसूल करण्याचा प्रस्ताव महापालिका अधिकाºयांनी पाठवावा, असे आदेश सभापती राहुल दामले यांनी प्रशासनाला दिले. त्यावर, कार्यवाही केली जाईल, असे अधिकाºयांनी सांगितले.