ठाणे : संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी उत्सव यंदा साजरा करण्यात येणार नसल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी दिली. हा दिवस आरोग्य उत्सव म्हणून साजरा केला जाणार असून, यादिवशी कायमस्वरूपी उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. कोरोनाचे संकट पाहता, दहीहंडी गर्दी करून मोठ्या प्रमाणात साजरी न करता त्याऐवजी जनतेला आरोग्य सुविधा देण्यासाठी हा प्लांट उभारल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोरोनामुळे यंदाही कोणतीही गर्दी न करता साध्या पद्धतीने दहीकाला उत्सव केला जाणार आहे. उत्सवाचे भव्य आयोजन न करता त्या पैशातून जनतेला आरोग्य सुविधा द्यावी असे विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा नगरसेविका परिषा सरनाईक यांनी सुचवले. त्यातून कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे एकमताने निश्चित झाले. प्रताप सरनाईक फाउंडेशन व विहंग चॅरिटेबल ट्रस्टने ठाणे शहरात रेमंड कंपनीसमोर विहंग पाम क्लब येथे हा कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांट उभारला आहे. या ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण ३१ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता ऑनलाईन पद्धतीने मुख्यमंत्री करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्लांटमधून १२० ऑक्सिजन सिलिंडर दिवसाला मिळणार आहेत. हे ऑक्सिजन जनतेला शिवसेनेतर्फे विनामूल्य दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. रिकामे सिलिंडर घेऊन येणाऱ्या नागरिकांना भरलेले ऑक्सिजन सिलिंडर येथून दिले जाणार आहेत. ज्यांच्याकडे सिलिंडर नसेल त्यांना डिपॉझीट घेऊन मोफत ऑक्सिजन सिलिंडर देण्याचीही योजना असल्याचेही त्यांनी सांगितले. या ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण झाल्यानंतर मतदारसंघातील नागरिकांना मोफत ऑक्सिजन सिलिंडर देण्यास सुरुवात केली जाणार आहे. ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा पालिका, सरकारी हॉस्पिटल, तसेच गरज पडल्यास खासगी हॉस्पिटल यांनाही केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.