मीरारोड - भाईंदरच्या भारतरत्न भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयातले पोषण पुनर्वसन केंद्र बंद असल्याचे वृत्त लोकमतने दिल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सदर केंद्र पुन्हा सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.
शहरात १४६ कुपोषित वर्गवारीतील बालके आढळली असताना दुसरीकडे २०१९ साला पासून जोशी रुग्णालयातील पोषण पुनर्वसन केंद्र मात्र बंद असल्याचे वृत्त लोकमतने दिले होते. केवळ मीरा भाईंदरच नव्हे तर ठाणे - पालघर जिल्ह्यातील कुपोषित बालकांची त्यांच्या मातांसह राहण्याची सोय केली जात होती. पोषण आहार दिला जात होता . पालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी सुरु केलेले केंद्र शासन कडे रुग्णालय गेल्यावर बंद झाले.
लोकमतच्या बातमीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव आसिफ शेख यांनी आरोग्यमंत्री टोपे यांची भेट घेऊन बातमी निदर्शनास आणून देत सदर पोषण केंद्र लहान बालकांसाठी तातडीने सुरु करण्याची विनंती केली . मंत्री यांनी सदर केंद्र सुरु करण्याचे आदेश लेखी स्वरूपात आरोग्य विभागास दिले आहेत . त्यामुळे पोषण केंद्र लवकरच सुरु होऊन कुपोषित बालकांना पोषक आहार व उपचार मिळतील असे शेख यांनी सांगितले .