कल्याण : केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेंतर्गत आउससोर्सिंगद्वारे महापालिकेच्या रुग्णालयांत रेडिओलॉजिस्ट नेमण्याचा ठराव मंजूर करूनही त्याची पूर्तता करण्यात मुख्य वैद्यकीय अधिकारी स्मिता रोडे या टाळाटाळ करत असल्याने त्यांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलेच फैलावर घेतले. तसेच रेडिओलॉजिस्ट तातडीने नेमावेत, असे आदेश दिले. आरोग्य सेवा पुरवण्यात चालढकल केल्याने शिंदे यांनी त्यांना चांगलाच डोस दिला. त्यानंतर, तरी ही सेवा महापालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.महापालिकेच्या रुक्मिणीबाई व शास्त्रीनगर रुग्णालयांमध्ये चांगली आरोग्य सेवा मिळत नाही, अशी रुग्णांची नेहमीच ओरड असते. या रुग्णालयांत डॉक्टरांसह इतर स्टाफची पदे रिक्त होती. त्यामुळे ती पदे मंजूर करण्यात आली. राज्य सरकारकडून ९० पदांना मंजुरी मिळाली. ही पदे भरण्याची प्रक्रिया २०१४ पासून सुरू आहे. परंतु, सर्व पदे भरली गेलेली नाही. त्यामुळे विशेषतज्ज्ञ असलेल्या डॉक्टरांची महापालिका रुग्णालयात कमतरता आहे. त्यामुळे रुग्णांना खाजगी रुग्णालयांत अथवा केईएम, कळवा तसेच अन्य सरकारी रुग्णालयांत पाठवले जाते. महापालिका रुग्णालयात दिलेल्या गोळ्यांमध्ये तार आढळली होती. तसेच एका बाळंतिणीचे बाळ दगावले होते. अशा अनेक घटना उघडकीस आलेल्या आहे.डॉक्टरांची पदे भरली गेली नसल्याने रेडिओलॉजीस्टच पद रिक्त आहे. डॉक्टर सरकारी रुग्णालयांत काम करण्यास तयार नसतात. त्यांचा कल खाजगी रुग्णालयांकडे असतो. रेडिओलॉजिस्ट नसल्याने रुक्मिणीबाई व शास्त्रीनगर रुग्णालयांत उपचारासाठी येणाºया रुग्णांचे निदान होत नाही. त्यामुळे रुग्णांना पुन्हा खाजगी रुग्णालयात पाठवले जाते. या सगळ्यावर मात करण्यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेंतर्गत काही सेवाभावी संस्था रेडिओलॉजिस्टची सेवा पुरवण्यास तयार आहेत. त्यापैकी काही संस्थांनी त्यांचे प्रेझेंटेशन महापालिकेत सादर केले आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेतील दरानुसार आउटसोर्सिंगद्वारे रेडिओलॉजिस्ट मागवण्याचा ठराव महापालिकेने केला आहे. त्यासाठी निविदा मागवण्याचे काम वैद्यकीय अधिकारी रोडे यांनी करणे अपेक्षित होते. त्याकरिता एकदाच निविदा काढली असल्याचे समजते.रेडिओलॉजिस्टसाठी नाममात्र दरात महापालिका रुग्णालयांत जागा उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. मात्र, तेथे जागा नसल्याचा कांगावा रोडे यांनी केला आहे. दोन्ही रुग्णालयांत जवळपास दोन ते अडीच हजार फुटांची जागा उपलब्ध आहे. मात्र, ती देता येत नसल्यास रुग्णालयाच्या आसपास आवारातच दोन हजार फुटांची एक स्वतंत्र शेड उभारता येईल. त्यात ही सुविधा सुरू करता येईल. परंतु, त्यात रोडे चालढकल करत आहेत. ही बाब या बैठकीत स्वत: महापौर राजेंद्र देवळेकर यांनी शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे शिंदे संतप्त झाले. अशा प्रकारची सेवा ठाणे महापालिकेत लवकरच सुरू होणार आहे. कल्याण-डोंबिवलीमधील नागरिकांना आरोग्य सेवेसाठी वेठीस धरले जात आहे. रेडिओलॉजिस्ट तातडीने नेमा. त्यासाठी पुन्हा निविदा काढा. एकदा निविदा काढून गप्प बसताच कसे, असा जाब विचारून रोडे यांना चांगलेच खडसावले.या वेळी आयुक्त पी. वेलरासू यांनाही शिंदे यांनी तुमचे काही नियंत्रण आहे की नाही, असा सवाल उपस्थित केला. त्यावर वेलरासू यांनी मी स्वत: जाऊन पाहणी करतो. जागा उपलब्ध करून देतो, असे आश्वासन दिले.
आरोग्य अधिका-यांना पालकमंत्र्यांचा ‘डोस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:24 AM