हुसेन मेमन/ऑनलाइऩ लोकमत
पालघर, दि. 2 - जव्हार येथील कुटीर रूग्णालयात रविवारी दुपारी ३.३० वाजता आरोग्य मंत्री दिपक सावंत यांनी अचानक भेट देऊन, रूग्णालयात दाखल असलेल्या कुपोषीत बालकांची पाहणी करून विचारपुस केली. जव्हार, मोखाडा व विक्रमगड व वाडा तालुक्यात कुपोषणाने बळी पडत असलेल्या बालकांच्या पालकांना व संबंधित डॉक्टरांना विचारणा करून सॅम व मॅम ची एस. एन. सी. यु. वार्डातील बालकांची पाहणी केली.
याबाबत मंत्री सावंत यंच्याशी चर्चा केली असता त्यांनी कुपोषीत बालकांची सद्य स्थिती काय आहे ? त्यांच्या वजनात वाढ होत की नाही ? याकरीता जव्हार व मोखाडा दौरा करीत आहे असे त्यांनी सांगितले. तसेच सॅम व मॅम मुलांचे मोनीटरींग करणे खुपच गरजेचे असुन त्यावर उपाय योजना केली जाईल व नविन प्रोटोकल तयार करून सॅम आणि क्रिटीकल सॅम अशी विभागणी करण्यात येणार असल्याचे सावंत यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
तसेच रूग्णालयात ६०० ग्रॅम वजनाचे बालके असून त्यांना लागणारे यंत्रणांचीही व्यवस्था लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगितले. २०० खाटांची मंजुरी सन २०१२ ला मिळालेली असून अद्याप २०० खाट का बसविले जात नाही यावर त्यांनी पुढच्या बजेटमध्ये नक्कीच २०० खाटांची तरतूद केली जाईल व स्त्री व बालक रूग्णालयही वेगळे केले जाईल असे आश्वासन सावंत यांनी दिले.
जव्हारला विक्रमगड, मोखाडा येथून रूग्ण येतात त्यामुळे येथे रूग्ण जास्त प्रमाणात दाखल होतात, परिणामी एका खाटावर २ रूग्ण अशी वाईट अवस्था सध्या दिसत आहे, यावर जव्हारला विशेष बाब म्हणून लवकरच २०० खाटांची तरतुद करण्यात येणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.