ठाणे : जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी या पहिल्या फळीतील म्हणजे फ्रंटलाइन वर्कर्सच्या तुलनेत हेल्थ वर्कर्स म्हणजे आरोग्य यंत्रणेचे स्वतः डॉक्टर, परिचारिका कोरोनाच्या या प्रतिबंधात्मक लसीकरणात मागे पडल्याचे वास्तव जिल्ह्यात आहे. आतापर्यंत त्यांचे पहिल्या डोसचे ९० टक्के व दुसऱ्या डोसचे फक्त ५८ टक्के लसीकरण झाले आहे. त्यामुळे यादरम्यान काही डॉक्टरांसह कर्मचारी कोरोनाच्या या
चक्रव्यूहात अडकल्याचे दिसून येत आहे.
देशात सर्वाधिक महानगरपालिकांचे शहर म्हणून ठाणे जिल्ह्याची देशपातळीवर ओळख आहे. या जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगर परिषदा आणि या शहरांना लागून असलेल्या ग्रामपंचायतींचे कार्यक्षेत्र बृहन्मुंबईत कार्यरत असलेल्यांच्या निवासस्थानांचा भार सांभाळत आहे. या दाटीवाटीने राहात असलेल्या रहिवाशांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिकांचे आजपर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, जिल्ह्यातील एक लाख दोन हजार ३३७ फ्रंटलाइन वर्कर्स, डॉक्टरांपैकी आतापर्यंत फक्त ९१ हजार ९८९ (९० टक्के) जणांनी पहिला डोस घेतला आहे. लसीकरण झालेल्यांपैकी ५८ टक्के म्हणजे ५३ हजार ५० डॉक्टरांसह परिचारिका, वाॅर्डबॉय आदींनी लसीकरणाचा दुसरा डोस घेतला आहे.
या महामारीत बाधितांना जीवदान देणाऱ्या डॉक्टरांसह परिचारिका, आरोग्य सेवकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस प्रारंभापासून देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, जिल्ह्याच्या आरोग्याची काळजी घेणारे डॉक्टर्स, परिचारिका आदींनी लसीकरण करून घेण्याचे गांभीर्याने घेतलेले दिसून येत नाही.
-सक्तीकरण करणे गरजेचे
जिल्ह्यातील पहिल्या फळीतील ८९ हजार ९२० या पोलीस यंत्रणेचा लसीकरणाचा पहिला डोस १०० टक्के पूर्ण झाला आहे, तर दुसरा डोस ३९ हजार ८४ जणांनी (४७ टक्के) पूर्ण केला आहे. यावरून लसीकरणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लसीकरण आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. प्रशासनाने यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर खासगी व्यवस्थापनाप्रमाणे सक्ती न केल्यामुळे आरोग्य व पोलीस यंत्रणेचे आतापर्यंत १०० टक्के लसीकरण झाले नसल्याचे दिसून येत आहे.