लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : निरोगी तन व शांत मन हीच खरी योगाची गुरुकिल्ली आहे, असे मत केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात झालेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, सध्या कोरोनाची रुग्णसंख्या व मृतांचे प्रमाणही अत्यंत कमी झाले आहे. परंतु, कोरोनाचे संकट टळले आहे, असे समजून निर्धास्त राहू नका, मोठ्या प्रयत्नांनी कोविडच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण ठेवण्यात आपण यशस्वी झालो आहोत. तरी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्कचा कटाक्षाने वापर करणे, हात वारंवार धुणे या त्रिसूत्रीचे अवलंब करावे. लसीचे दोन डोस घेतल्यानंतरदेखील ही बंधने पाळावीत, असे आवाहन आयुक्तांनी यावेळी उपस्थितांना केले.
कोविडच्या पहिल्या लाटेच्या वेळी जनमानसावर येणारा ताण दूर व्हावा व नागरिकांना विरंगुळ्याचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी मनपाने गेल्या वर्षभरात जवळजवळ १५०० विविध मनोरंजनाचे कार्यक्रम फेसबुकद्वारे सादर केले. त्यात योगासनांचे कार्यक्रमही सादर करण्यात आले. त्याचा फायदा झाल्याचे नागरिकांनी सांगितल्याचे आयुक्त यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली, उपआयुक्त पल्लवी भागवत, उपायुक्त विनय कुलकर्णी, मनपा सचिव संजय जाधव, सहायक जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय लधवा यांनी केले.
योगासनांचे प्रकार सादर
- जागतिक योग दिनानिमित्त सावित्रीबाई फुले नाट्यगृहात कोविड लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांसमोर कल्याण-डोंबिवलीतील प्रख्यात योगशिक्षक सचिन गोडांबे, श्रीकांत देव यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध योगासनांचे प्रकार सादर केले.
- यावेळी एका वाहिनीवरील संगीतविषयक स्पर्धेत कार्यक्रमात पारितोषिक मिळवून कल्याण-डोंबिवलीचा बहुमान वाढविलेल्या प्रज्ञा साने हिचा आयुक्तांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
-----------